गोवा खबर : ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळावा (टीआयटीएफ) २०२४ मधील गोवा पर्यटनाच्या दालनाचे उद्घाटन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते व उझबेकिस्तानमधील भारतीय राजदूत स्मिता पंत आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताक पर्यटन समितीचे अध्यक्ष उमिद शादीव यांच्या उपस्थितीत झाले.
उदघाटना समारंभाला पर्यटन मंत्र्यांचे ओएसडी शॉन मेंडिस; जीटीडीसी मार्केटिंग उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर आणि जीटीडीसी व्यवस्थापक अनिल दलाल देखील उपस्थित होते.
सीएईएक्स, ताश्कंद येथे २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान आयोजित टीआयटीएफ २०२४, गोव्याची दोलायमान संस्कृती, उबदार आदरातिथ्य आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी विशेष हॉलिडे पॅकेजे दाखवण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करत आहे.
पहिल्याच दिवशी खंवटे यांनी गोवा आणि उझबेकिस्तानमधील पर्यटन संबंध वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून उमिद शादिव यांच्याशी फलदायी चर्चा केली. या चर्चेत पर्यटनाला चालना देणे, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे आणि दोन्ही देशांसाठी परस्पर आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने, सहयोगी उपक्रमांचा शोध घेण्यात आला.
या व्यतिरिक्त खंवटे यांनी उझबेकिस्तानमधील प्रमुख टूर ऑपरेटर 'सेन्ट्रम एअर'ची भेट घेतली आणि उझबेकिस्तानमधील पर्यटकांसाठी गोवा हे पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्याच्या धोरणांवर चर्चा केली. उझबेकिस्तानच्या पर्यटन बाजारपेठेत गोव्याचा ठसा वाढवण्यासाठी टूर ऑपरेटर्समध्ये जागरूकता पसरविणे, त्यांच्या समस्या दूर करणे आणि मजबूत भागीदारी निर्माण करण्यावर, या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.
खंवटे, स्मिता पंत आणि गोवा पर्यटन संघ व सह-प्रदर्शकांसह, दुपारच्या जेवणावेळी झालेल्या फलदायी चर्चेत सामील झाले. द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि भारत व उझबेकिस्तानमधील पर्यटन उपक्रमांना पुढे नेण्याच्या उद्देशाने ही चर्चा झाली. मंत्री खंवटे यांनी दालनामध्ये टूर ऑपरेटर आणि व्यापार भागीदारांसह बी2बी बैठका घेतल्या, तसेच
टेलिव्हिजन, प्रिंट आणि ऑनलाइन व्यापार पोर्टलवरील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या संवादांमुळे गोव्याचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून वाढणारे महत्त्व अधोरेखित झाले आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवण्याच्या राज्याच्या बांधिलकीला देखील बळकटी मिळाली.
याव्यतिरिक्त, गोवा पर्यटन दालनावर एक मंत्रमुग्ध करणारे सांस्कृतिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलेहोते. जेथे आकर्षित करणारे गोमंतकीय नृत्य, राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि दोलायमान परंपरांचे प्रदर्शन करण्यात आले. सादरीकरणाने उपस्थितांना मोहित करून गोव्याची अनोखी जादू पसरवली आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांवर कायमची छाप सोडली.
टीआयटीएफ २०२४ मधील आपल्या सहभागाच्या यशावर, नाविन्यपूर्ण पर्यटन उपाय, शाश्वत प्रवास पद्धती आणि पुनरुत्पादक पर्यटन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर नव्याने लक्ष केंद्रित करणे, पर्यटन विभागाचे उद्दिष्ट आहे. गोवा आपले नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जपत, जागतिक पर्यटनात नवीन मानके प्रस्थापित करण्यासाठी वचनबद्ध आहे.