गोवा खबर : गोवा–पर्पल फेस्ट उपक्रमांतर्गत “कलर्स ऑफ रेझिलिअन्स” या पहिल्यावहिल्या प्रेरणादायी कार्यक्रमाचे अनावरण दोनापावल-वायंगिणी किनाऱ्यावरील ताज सिदाद दि गोव हेरिटेजमध्ये प्रचंड टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून गोव्यातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन उंचावण्याची क्षमता असलेल्या कलांमधील परिवर्तनशील शक्तीचा उत्सव साजरा करण्याचा एक नवीन अध्याय सुरू होत आहे.
कलाकार, कवयित्री आणि दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या फ्रेडरिका मिनेझिस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला कलर्स ऑफ रेझिलिअन्स हा कार्यक्रम कला आणि कणखरपणा यांच्यातील विलक्षण समन्वयाचे प्रदर्शन घडवत आहे.
या कार्यक्रमाचा प्रारंभ “प्रिव्ह्यू फेलोशिप”च्या आयोजनातून झाला. याप्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, जगप्रसिद्ध एस्टोनियन कलाकार तावनो कांगरो यांचा समावेश होता. तसेच कलाकार निधी शर्मा, मुंबईस्थित कलाकार मनोज दास, फ्रेडरिका मिनेझिस यांनी प्रेरणादायी उपक्रमास आपल्या अनोख्या कलात्मक दृष्टिकोनाची जोड दिली आहे.
राजस्थानमधील नवव्या पिढीचे संतूर विशारद आणि संगीतकार नवाब खान यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणांने रसिकांना मंत्रमुग्ध केले आणि कलेमध्ये दडलेल्या उपचारात्मक आयाम अधोरेखित केला.
लवचिकता आणि समावेशकता या भावनांचे प्रतिबिंब सादर करणाऱ्या उल्लेखनीय कलाकृतींचे प्रदर्शन, १६ नोव्हेंबर आणि रविरार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, कलर्स ऑफ रेझिलिन्स हा उपक्रम म्हणजे दिव्यांग व्यक्तींमधील कणखर, सकारात्मक बाणा आणि कलासक्त सर्जनशीलतेचे अनोखे उदाहरण सादर करणार आहे. कलाकारांमधील प्रतिभेचे दर्शन घडवण्याबरोबरच विविधता आणि समावेशकता या बाबींना प्राधान्य देणारा समाज घडवण्यास हा उपक्रम प्रोत्साहन देणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होत परिवर्तनशील प्रवासाचा आणि विविध मर्यादांच्या पलीकडे घेऊन जाणाऱ्या कलेचा आस्वाद प्रत्येक कलाप्रेमीने घ्यावे, असे आवाहन राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने केले आहे.