गोवा खबर

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोवा दालनाचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : नवी दिल्लीच्या भारत मंडपात आयोजित 43 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात विकसित भारत 2047 या संकल्पनेवरील गोव्याच्या दालनाचे माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांच्याहस्ते आज उद्घाटन झाले.

साहाय्यक माहिती अधिकारी शांतो नाईक, माहिती साहाय्यक सिद्धेश सामंत, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे प्रशासकीय अधिकारी सदाशिव पंडीत आणि इतर खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बांदेकर यांच्याहस्ते आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोंय पुस्तिकेचेही प्रकाशन झाले.

भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा एक मोठा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आहे आणि व्यवसाय, उद्योग, संस्कृती आणि शैक्षणिक उपक्रमांच्या प्रोत्साहनास व्यासपीठ उपलब्ध करून देतो. मेळाव्यात उद्योग, व्यापार आणि इतर व्यावसायिक उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन मांडण्यात येते.

भारत मंडपात गोव्याचे दालन सुमारे 203 चौ. मी. जागेत उभारण्यात आले असून दालन गोव्याची वास्तुकला आणि प्रगतीचे दर्शन घडविते. गोव्याच्या दालनात गोव्यातील पर्यटन, गुंतवणूक सुविधा, उद्योग आणि इतर विकास, गोव्याची लोककला आणि संस्कृती, गोव्याचे खाणे-जेवण आणि इतर सुविधांवर प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

माहिती आणि प्रसिद्धी खात्यासह, पर्यटन खाते, हस्तकला, कावी कला, टॅक्सटाईल आणि कॉयर, गोवा पर्यटन विकास महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ या मेळाव्यात सहभागी झाले आहे. तसेच गोव्याच्या हस्तकारांगिरांनी आपल्या उत्पादनाचे विक्री-प्रदर्शन मांडले आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत हा व्यापार मेळावा भरणार आहे.

गोव्याच्या दालनाचे डिझाईन आणि उभारणी मे. मिर्ची रिपब्लिक मिडिया प्रॉडक्शनचे सन्मान केंकरे आणि आर्यन खेडेकर यांनी केले आहे. गोव्याच्या दालनात प्रत्येक दिवशी गोव्याच्या कलाकारांच्या वतीने गोव्याच्या पारंपरिक कला आणि संस्कृतीवर कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येईल.

गोव्याच्या दालनाच्या उद्घाटनापूर्वी केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन झाले.

Trending

Exit mobile version