गोवा खबर

राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाद्वारे पहिल्या “कलर्स ऑफ रेझिलियन्स” उपक्रमाचे आयोजन; पर्पल फेस्टच्या प्रोत्साहनातून कला आणि सक्षमीकरणाचा अनोखा उत्सव

Published

on

Spread the love
गोवा खबर: गोव्यातील दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात उन्नती साधणाऱ्या कलांमधील परिवर्तनकारी शक्तीचा सोहळा साजरा करण्याच्या उद्देशाने राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने पर्पल फेस्ट समर्थित “कलर्स ऑफ रेझिलन्स” हा प्रेरणादायी उपक्रम सादर करण्यात येत आहे.
गोव्यातील प्रसिद्ध कलाकार, कवयित्री आणि दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या फ्रेडरिका मिनेझिस यांच्या संकल्पननेतून गोव्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी जागरुकता आणि मदत करण्यासाठी प्रतिभांवंत कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या अभिमानाने पर्पल फेस्टद्वारे करण्यात येत आहे. शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८:३० दरम्यान वायंगिणी किनाऱ्यावरील ताज सिदाद दि गोवा हेरिटेजमध्ये या उपक्रमाअंतर्गत “प्रिव्ह्यू फेलोशिप”चे आयोजन करण्यात आले आहे. तर १६ व १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत हे कलाप्रदर्शन होणार आहे.
प्रदर्शन, चर्चासत्रे आणि वैविध्यपूर्ण कलाप्रकार या माध्यमातून सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकता या बाबींना प्रोत्साहन देणे हा उद्देश “कलर्स ऑफ रेझिलिअन्स”च्या आयोजनामागे आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्पल फेस्टचा एक महत्त्वपूर्ण नवा अध्याय सुरू होत आहे. कलाकारांना आपले कलाकौशल्य सादर करता यावे आणि या माध्यमातून सर्वसमावेशकतेच्या विधायक कार्याला पाठबळ मिळावे या उद्देशाने एक प्रभावी कलाव्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या भावनेने ताज (सिदाद दि गोवा हेरिटेज), एक्रॉन ग्रुप, लिक्विड गोल्ड, बिग बनियान, डीटीआरच्या कलाकार लविना सोरेस आणि इतर स्वयंसेवकांनी या उपक्रमाच्या आयोजनासाठी आपले कौशल्य आणि वेळ तसेच आर्थिक मदत दिली आहे.
फ्रेडरिका मिनेझिस या एक नामवंत लेखिका, कवयित्री आणि डिजिटल कलाकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची आजवर सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच गोव्यातील विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमध्येही त्यांचे कार्य, लेखन विस्तृतपणे प्रसिद्ध झाले आहे. आपले विचार आणि सर्जनशीलतेचा प्रवास जगासमोर टेडएक्स टॉकच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यासाठीही मिनेझिस यांची ओळख आहे.
सेरेब्रल पाल्सीची समस्या असलेल्या फ्रेडरिका यांचा जीवनप्रवास अतीशय संघर्षमय आणि तितकाच दमदार राहिला असून मानवी आत्म्यामध्ये असलेल्या चिरंतन शक्तीचा ठाव घेणारी कलाकारी आणि कवितांच्या माध्यमातून त्यांचा हा जीवनप्रवास प्रतिबिंबित होत आला आहे. आपल्या कलासक्त नजरेतून ज्वलंत आणि प्रभावी चित्रांच्या माध्यमातून त्या जीवनाबाबतचा आपला अनोखा दृष्टिकोन सादर करतात.
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या ध्येयाप्रती आपली कटिबद्धता कलर्स ऑफ रेझिलिन्स या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहे. या अनोख्या कलामालिकेच्या माध्यमातून दिव्यांग कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करणे, त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण करणे प्रवेशसुलभ साधनसुविधांच्या विकासासाठी निधी उभारणे आणि गोव्यातील कला व सामाजिक क्षेत्रामध्ये आपले स्वतःचे असे स्थान स्थापित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या कलात्मक प्रतिभेचे प्रदर्शन घडवणे, चित्रकला, शिल्पकला अशा विविध कलांच्या माध्यमातून आपले अनोखे दृष्टिकोन व्यक्त करणे हे कलर्स ऑफ रेझिलिन्सचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनामध्ये सादर होणाऱ्या सर्व कलासाहित्याचा लिलाव करण्यात येणार आहे. याद्वारे मिळालेल्या उत्पन्नाचा काही वाटा थेट संबंधित
कलाकारांना दिला जाणार आहे. तसेच या निधीतून गोव्यात सक्षमीकरण, प्रवेशसुलभता आणि समावेशनाला सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्थांना पाठबळ दिले जाणार आहे.
या उपक्रमाप्रती उत्कंठा वाढवणारे प्रमुख आकर्षण म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी आयोजित “प्रिव्ह्यू फेलोशिप”मध्ये  प्रसिद्ध एस्टोनियन शिल्पकार तावनो कांग्रो यांचा सहभाग होय. त्यांची मनमोहक शिल्पे जगभरातील अनेक खासगी आणि सार्वजनिक संग्रहांमध्ये आढळून येतात. त्यामुळे त्यांचा सहभाग असलेला हा उपक्रम जागतिक स्तरावर पोचणार आहे. या उपक्रमादरम्यान तावनो कांग्रो हे प्रत्यक्ष शिल्पनिर्मिती करणार असून या शिल्पाचाही लिलाव करून निधी उभारला जाणार आहे.
या उपक्रमातील आणखी एक उल्लेखनीय पाहुणे म्हणजे मुंबईस्थित प्रसिद्ध कलाकार मनोज दास. या कार्यक्रमामध्ये श्री. दास हे प्रत्यक्ष चित्रकृती सादर करणार असून याद्वारे कलामंचावर अनोखा कलासंगमाचा आविष्कार घडणार आहे. कला क्षेत्रातील तीन दशकांहून अधिकचा अनुभव असलेले श्री दास हे दूरदर्शी असे कलाकार आहेत. आजवर त्यांची यांनी ३००हून अधिक प्रदर्शने झाली असून २००हून अधिक लाइव्ह परफॉर्मन्सद्वारे त्यांनी कलारसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांची ऑन-साइट पेंटिंग देखील लिलावासाठी उपलब्ध असतील. यामुळे या विशाल उद्दिष्टासाठी आयोजित उपक्रमातून  अर्थपूर्ण कलाकृती प्राप्त करण्याची दुर्मिळ संधी कलाप्रेमींना मिळणार आहे.
प्रतिभेच्या या नक्षत्रमंडळात सहभागी प्रसिद्ध कलाकार निधी शर्मा यांच्या ऑनसाइट चित्रकृतीही लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यांच्या कलाकृतींमधून सादर होणारी हिमालयाची भव्यता आणि अध्यात्माची सर्वव्यापकता  कलाप्रेमींसाठी मोठे आकर्षण राहणार आहे. त्यांच्या कलाकृतींमध्ये हिमालयाची उत्तुंग शिखरे, खळखळणाऱ्या नद्या आणि नाजूक वनस्पती यांचे जिवंत, चित्तथरारक सौंदर्य टिपले गेले आहे. त्यांनी ओढलेल्या प्रत्येक रंगोटा भारतातील वैविध्यपूर्ण, अनोख्या धरतीसौंदर्याचे प्रदर्शन सादर करतो. शर्मा यांच्या चित्रकृतींबरोबर फ्रेडरिका यांच्या निवडक कलाकृतींचा लिलाव केला जाणार असून याद्वारे संकलित होणार निधी दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक सेवा आणि उपक्रमांसाठी मदत म्हणून दिला जाणार आहे.
राजस्थानमधील नवव्या पिढीचे संतूर विशारद आणि संगीतकार नवाब खान यांचे सायंकाळी होणारे संतूरवादन या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेणार आहे. १००-तारी संतूर वाजवण्यात प्राविण्य मिळवलेले नवाब खान यांच्या घराण्याचा इतिहास भारतातील शाही दरबारांमध्ये सापडतो. त्यांच्या परिवर्तनकारी संगीताने जगातील विविध खंडातील कलाप्रेमींना एकत्र आणले आहे. जोधपूर येथील म्युझिक मेडिटेशन सेंटरचे संस्थापक आणि मंत्रा बँडचे प्रमुख असलेले नवाब खान यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला विविध परंपरांमधील आध्यात्मिक मंत्रांमध्ये गुंफले असून याद्वारे शांती आणि एकतेचा संदेश जगाला दिला आहे. त्यांची ही अदाकारी या कार्यक्रमात समाधानाचा, शांततेचा बंध गुंफणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन सादर करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करणे आणि त्यांच्यासाठी साधनसंसाधनांचा विकास व उपलब्धता करणे हा उद्देश कलर्स ऑफ रेझिलिन्सच्या माध्यमातून फ्रेडरिका मिनेझिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाळगलेला आहे. एकूणच वैविध्यपूर्ण कलाविष्कार सादर करत, कलाकार व कलाप्रेमींना एका व्यासपीठावर आणणे आणि या माध्यमातून गोव्यातील कला क्षेत्रातील वैविध्यता व सर्वसमावेशकता सादर करण्याची संधी कलाप्रेमींना उपलब्ध झाली आहे.
या कार्यक्रमासाठी आपला वेळ आणि योगदान देणारे स्वयंसेवक म्हणजे अश्वनी आनंद, विवेक बत्रा, समीर खाबेसिया आणि त्यांची ताज सिदाद दि गोवा हेरिटेजची टीम; अनोका इस्टेट्सचे स्टीव्ह गटकिन आणि संकेत कुडाळकर; एक्रॉन ग्रुपचे ज्युलियन डिसोझा, सर्वेश शेटगांवकर; डॉ. कार्दोस लॅबच्या मारिया डो सेउ काद्रोस; डीटीआरचे लिंडन फुर्तादो, ग्रोथ ग्रॅव्हीचे विरेश वझिरानी आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातील प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

Trending

Exit mobile version