गोवा खबर: एका पोलिस कॉन्स्टेबलला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पैशांच्या बदल्यात सरकारी नोकरी देण्याच्या प्रकरणात आत्महत्त्या केलेल्या घटनांची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, असे सांगून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘कॅश फॉर जॉब’ची सखोल चौकशी करून त्यात गुंतलेल्या एजंटांच्या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी केली.
पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे यांच्या आत्महत्येशी संबंधित दोन निलंबित महिला कॉन्स्टेबल कोलवाळ कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून जखमी झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया देताना आलेमाव म्हणाले की, राज्य सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे.
आत्महत्येस प्रवृत्त करणे ही गंभीर बाब असून ती गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यात एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. कशामुळे त्यांना हे कठोर पाऊल उचलण्यास भाग पाडले, याची सखोल चौकशी व्हायला हवी, असे आलेमाव म्हणाले.
राज्यातील पोलिस दबावाखाली येण्याची शक्यता असल्याने नोकरी घोटाळ्याचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे किंवा न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, असे आलेमाव म्हणाले.
‘‘मार्शेल येथील पोलिस आवटपोस्टवर तक्रार करण्यासाठी काही जण आले असता, त्यांना मदत करण्याऐवजी एक पोलिस अधिकारी आरोपीच्या गाडीत बसला होता अशी माहिती मिळाली आहे. अशा प्रकारांमुळे आरोपींना सुरक्षा दिली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे आलेमाव म्हणाले.
‘‘हा राज्यातील मोठा नोकरी घोटाळा असल्याचे दिसत असून, यामध्ये आरोपींनी लोकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली आहे. एक गोष्ट समजून घ्यायला हवी की लोकांनी त्यांना पैसे दिले कारण पूर्वी त्यांनी सरकारी नोकऱ्या दिल्या असाव्यात. त्यामुळे या संपूर्ण टोळीमागे कोण आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे,’’ याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले.
‘‘लाच देऊन नोकरी मिळवणाऱ्यांवर कारवाई करणार का, हेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे. या प्रवृत्तीमुळे राज्यातील पात्र उमेदवार सरकारी नोकरी मिळण्यापासून वंचित राहत आहेत, असे आलेमाव म्हणाले.
‘‘ज्यांनी नोकरीसाठी पैसे दिले आहेत, त्यांचे पैसे परत मिळायला पाहिजेत. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये आणि अशा घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. यात सामील असलेल्या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे आलेमाव म्हणाले.
भ्रष्ट भाजप सरकार अशा घोटाळ्यांवर कारवाई करण्यास गंभीर नाही, असा आरोप काँग्रेस नेत्याने केला.
‘‘पणजीचे भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी गेल्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकऱ्यांच्या घोटाळ्यावरून आपल्याच सरकारचा पर्दाफाश केला होता. परंतु पात्र उमेदवारांना न्याय देण्यासाठी काहीच केले नाही आणि नोकऱ्या विकण्याचे प्रकार कायम आहे,’’ असे आलेमाव यांनी म्हटले.