गोवा खबर

एस्कॉर्ट वेबसाईट ब्लॉक करण्यात भाजप सरकार अपयशी : युरी आलेमाव

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोव्याची बदनामी करणाऱ्या वेश्या व्यवसायासाठीच्या तस्करीला  आळा घालण्यात व एस्कॉर्ट वेबसाईट्स ब्लॉक करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गुरुवारी केला. 
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लैंगिक तस्करी रोखण्यासाठी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आलेमाव म्हणाले की, भाजप सरकार या संदर्भात कारवाई करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
गोव्यात लैगिक सेवा देणाऱ्या शेकडो एस्कॉर्ट सर्व्हिस वेबसाइट्स आहेत. ते आपले फोन नंबर आणि या सेवेची व्यवस्था करू शकतील अशी ठिकाणे देतात. असे असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आणि त्यांना रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप आलेमाव यांनी केला.
आपल्या समृद्ध सुसंस्कृत राज्याची बदनामी झाली आहे. उत्तर गोव्यात आमच्या मुली-बहिणींना संध्याकाळी घराबाहेर पडता येत नाही. नुकतेच कळंगुट येथे एका पर्यटकाने स्थानिक मुलीबद्दल अश्लिल टिप्पणी केली. ते बेशिस्त वागण्याचे धाडस करतात कारण या वेबसाइट गोव्याला एस्कॉर्ट सेवेचे केंद्र म्हणून प्रोजेक्ट करतात. सरकारने डबल इंजिनचा वापर करून त्यांना रोखण्याची गरज आहे, जर ते अपयशी ठरले तर त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि गुन्हे शोधण्याच्या प्रगतीची बढाई मारू नये, असे आलेमाव म्हणाले.
प्रमोद सावंत यांनी २०२२ मध्ये गोव्यातील लोकांना लैंगिक तस्करीचा मुद्दा केंद्र सरकारकडे मांडण्याचे आश्वासन दिले होते, कारण अशा प्रकरणांमध्ये ९३ टक्के व्यक्ती इतर राज्यातील असतात. परंतु इथेही ते अपयशी ठरल्याचे आलेमाव म्हणाले.
‘‘गोव्यात लैंगिक तस्करी खपवून घेतली जाणार नाही आणि गोव्यातील वेश्या व्यवसाय तस्करीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते. पण गृहमंत्री या नात्याने ते या समस्येला सामोरे जाण्यात अपयशी ठरले आहेत,’’ असे आलेमाव म्हणाले.
गुप्त नेटवर्कद्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘पुरुष एस्कॉर्ट सर्व्हिसेस’वर कारवाई करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही आलेमाव यांनी केला.
2013 मध्ये गोव्यातील एका पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन करून अशा नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. या कारवाईची सर्व माहिती, आरोपींचे बँक डिटेल्स आणि फोन नंबर गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेला देण्यात आले. पण अद्याप काहीही झालेले नाही. गोव्यात एस्कॉर्ट सेवा चालवणाऱ्या आरोपींना पकडण्यात अधिकारी अपयशी ठरतात, असा आरोप त्यांनी केला.

Trending

Exit mobile version