गोवा खबर : राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्यावतीने ११ ऑक्टोबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिना’च्या निमित्ताने ग्रामपंचायत सभागृह मये, डिचोली येथे कार्यक्रम संपन्न झाला.
आंतरराष्ट्रीय ‘कन्या दिन’ हा दिवस जगभरातील मुलींच्या हक्कांचा आणि कल्याणाचा प्रचार करण्यासाठी समर्पित आहे. मुलींचे सक्षमीकरण, त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व प्रतिपादित करण्याचा हा एक प्रसंग आहे.
आयुष्मान आरोग्य मंदिर – प्राथमिक आरोग्य केंद्र मये यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मये मतदारसंघाचे आमदार व फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात मुलीचे महत्त्व विषद केले.
ॲड. रुचिका नाईक या प्रमुख वक्त्या होत्या आणि त्यांनी पीसी- पीएनडीटी कायदा आणि मुलीचे महत्त्व विषयावर व आरोग्य सेवा खात्याच्या उपसंचालक डॉ. शाहीन सैय्याद यावेळी उपस्थित होत्या.
राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी पीसी-पीएनडीटी कायदा आणि बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत आयईसी उपक्रमांतर्गत सध्याची परिस्थिती मांडली. आरोग्य अधिकारी आयुष्मान आरोग्य मंदिर – प्राथमिक आरोग्य केंद्र मये डॉ. सिद्धी कंसार, यांनी स्वागत केले. शंकर चोडणकर अध्यक्ष (एन.जी. जि.प.) यांनीही यावेळी उपस्थिती लावली. मयेच्या सरपंच सीमा आरोंदेकर यावेळी उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित राज्य कार्यक्रमात आकाशकंदील, दिये व पिशव्या बनविण्याच्या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेतील आकाशकंदील, दिये व पिशव्या प्रदर्शनस्थळी ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी स्थानिक महिला जयश्री पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी “बेटी बचाओ बेटी पढाओ” या संकल्पनेवर नृत्य सादर करण्यात आले. उमेश खोलकर आणि श्रद्धा नाईक यांनी सूत्रसंचतालन केले. ॲड. आदिती पालेकर यांनी आभार मानले.