गोवा खबर

रस्ते वापरकर्त्यांनी रस्त्यांवर जबाबदारीने वागण्याची गरज : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : वाहतूक संचालनालयातर्फे डॉन बॉस्को हायस्कूल, पणजी येथे आयोजित १३ व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह-२०२४ च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील रस्त्यांवर कोणतेही अपघात होणार नाहीत याची खात्री करणे ही केवळ सरकारची नाही, तर सर्व रस्ते वापरकर्त्यांची जबाबदारी आहे असे सांगितले.

गोव्यात दररोज सरासरी एक अपघाती मृत्यू होत असल्याची खंत व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या अनुकरणीय शैलीत ‘भिवपाची गरज आसा.’ असे सांगितले. दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना फोन वापरणे, स्टंट करणे, ओव्हर स्पीडिंग इत्यादी हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण आहे हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुरक्षितता वाढविण्यासाठी, त्यांनी वाहतूक अधिकाऱ्यांनी गोव्यात प्रवेश करणाऱ्या आंतरराज्यीय प्रवासी वाहन चालकांची तपासणी करून ते दारू पिऊन वाहन चालवित नाहीत याची खात्री करावी असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की रस्ते अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना भरपाई देताना सरकारने नेहमीच तत्परतेने प्रतिसाद दिला आहे, परंतु जीवन मौल्यवान असल्याने जीव वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे ते म्हणाले. डॉ. सावंत यांनी यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या रस्ता सुरक्षा नियमांवरील प्रदर्शनातील सर्जनशीलतेचे कौतुक केले.

 वाहतूक मंत्री  माविन गुदिन्हो यांनी गोव्यातील रस्त्यांवर इतके अपघात का होत आहेत, याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की तरुणांनी रस्त्यावर वाहन चालविताना रस्त्यावरील नियम पाळण्याची गरज असल्याचे सांगून वाहतूक मंत्र्यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकार लवकरच नाईट व्हिजन कॅमेरे बसविणार आहे ज्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल आणि अधिक जबाबदारीही येईल असे त्यांनी सांगितले.

वाहतूक खात्याचे संचालक पी. प्रविमल अभिषेक, आयएएस यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कालावधीत रस्ता सुरक्षा आणि नियमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी रस्ता सुरक्षा हिरो बना या संकल्पनेखाली अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले.

रस्ता सुरक्षा हे विविध खात्यांचे सामूहिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आणि रस्ते सुरक्षेसाठी काम करणाऱ्या खाते आणि स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक स्वयंसेवकांचे कौतुक केले. गोव्यातील रस्ता सुरक्षेसाठी खाते स्मार्ट तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 यावेळी रस्ता सुरक्षेवरील चित्रपट निर्मिती स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

Trending

Exit mobile version