गोवा खबर

सीएसआयआरच्या 83 व्या स्थापना दिनानिमित्त एनआयओने आयोजित केलेल्या ‘ओपन डे’ कार्यक्रमात गोव्यामधील 1000 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

Published

on

Spread the love

 गोवा खबर:वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेने (सीएसआयआर-एनआयओ) 26 सप्टेंबर 2024 रोजी सीएसआयआरच्या 83 व्या स्थापना दिनानिमित्त, डोना पाउला येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये ‘ओपन डे’ आयोजित केला होता.

यावेळी, गोव्यातील 32 शाळांमधील 1000 हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांसह संस्थेला भेट देऊन तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि संस्थेमधील प्रयोगशाळांना भेट दिली.

सागरी विज्ञानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी एनआयओने या विषयाशी संबंधित विविध चित्रपट यावेळी प्रदर्शित केले. कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, एनआयओच्या सभागृहात इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर इन ओशनोग्राफी’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. उत्सवाचा एक भाग म्हणून, महासागर संशोधनामध्ये संस्थेने हाती घेतलेल्या वैज्ञानिक उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सागरी साधन संपत्ती आणि उपकरणांच्या  प्रदर्शनालाही विद्यार्थ्यांनी भेट दिली.

सीएसआयआरच्या  स्थापना दिनानिमित्त एनआयओने सोमवार, 30 सप्टेंबर 2024 रोजी एनआयओच्या सभागृहात आयआयटी गोवाचे संचालक प्रा. धीरेंद्र एस. कट्टी यांचे, ‘लसी कशा विकसित केल्या जातात? बहु-औषध प्रतिरोधक अतिसारासाठी लसी आणि नॅनोवॅक्सीन विकसित करण्याचा माझा अनुभव’, या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित केले असून, यासाठी प्रवेश खुला असेल.

 

विविध विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमधील अत्याधुनिक संशोधन आणि विकासाबाबतचा ज्ञानसाठा, यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सीएसआयआरकडे देशभरात 37 राष्ट्रीय प्रयोगशाळा, 39 आउटरीच सेंटर्स, एक इनोव्हेशन कॉम्प्लेक्स आणि तीन युनिट्स, असे विशाल नेटवर्क आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाश्वत उपाय आणि क्षमता विकासाद्वारे नवोन्मेशी आणि जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून भारतातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे, हे सीएसआयआरचे उद्दिष्ट आहे.

Trending

Exit mobile version