गोवा खबर

बेरोजगारीचे प्रमाण वाढले, सरकार तरुणांना अंधारात ढकलणार: युरी आलेमाव

Published

on

Spread the love
गोवा खबर: वाढत्या बेरोजगारीवरून भाजप सरकारवर जोरदार टीका करत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, सत्ताधारी पक्ष राज्यातील तरुणांवर गंभीर अन्याय करत असून त्यांना अंधारात ढकलत आहे.
पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे 2023-24 च्या अहवालात राज्याचा बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरी 4.5% च्या तुलनेत 8.7% असल्याचे म्हटले आहे. त्याच्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
‘‘गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना बेरोजगारीदराबाबत पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेकडून आणखी एक प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यात भाजपचे डबल इंजिन अपयशी ठरले आहे, त्यामुळे युवक संधी आणि नोकऱ्यांपासून वंचित आहेत,’’ असे आलेमाव म्हणाले.
आलेमाव म्हणाले की, डबल इंजिन सरकारने जीएसटी लागू करून छोटे व्यवसाय संपवले आहेत. आता बेरोजगारी भयावह पद्धतीने पसरली आहे. पण रोजगार निर्मिती करून परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार काहीच करत नाही. यामुळे गोव्यातील तरुणांना नोकरीच्या शोधात परदेशात जावे लागत आहे.
‘‘एकीकडे भाजप सरकार नोकऱ्या विकण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे खासगी कंपन्यांकडून होणाऱ्या नोकरभरतीवर त्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे दोन फार्मा कंपन्यांनी नुकतीच महाराष्ट्रातील तरुणांना गोव्यात भरती करण्यासाठी जाहिरात दिली होती.  तरीही हे भ्रष्ट सरकार हॉस्पिटॅलिटी आणि इतर क्षेत्रात रोजगार निर्मितीचा दावा करत आहे,’’ असे आलेमाव म्हणाले.
गोव्यात एनआयटीसारख्या केंद्र सरकारच्या संस्था आहेत, पण तिथे स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत.   तिथे इतर राज्यातून लोकांना कामावर घेतले जाते. हा आमच्या तरुणांवर अन्याय आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्यातील वाढत्या बेरोजगारीबाबत वेळोवेळी खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाने आपल्या अहवालात गोव्यातील बेरोजगारीचे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचे उघड केले होते, याकडेही आलेमाव यांनी लक्ष वेधले.
ते म्हणाले की, बेरोजगारीच्या परिस्थितीचा समाजावर निश्चितच वाईट परिणाम होईल, तो होवू नये यासाठी सरकारने पाउले उचल्ली पाहिजे.

Trending

Exit mobile version