गोवा खबर

डबल इंजिन’मध्ये वारंवार बिघाड, पोप फ्रान्सिस यांना गोव्यात आमंत्रित करण्यात भाजपला अपयश : विरोधी पक्षनेते आलेमाव

Published

on

Spread the love
गोवा खबर : जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषाच्या दहावार्षिक प्रदर्शना निमित्त पोप फ्रान्सिस यांना निमंत्रित करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी ठरल्याची बाब दुर्दैवी असल्याचे सांगत, जनतेच्या भावनांचा आदर करण्यात भाजप सरकार पुन्हा अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. 
‘‘मी 2023 मध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहून आणि याच धर्तीवर इतर अनेकांनी विनंती करूनही डबल इंजिन सरकार पोप फ्रान्सिस यांना गोव्यातील प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात अपयशी ठरले आहे. फेब्रुवारी १९८६ मध्ये पोप जॉन पॉल (II) यांचा गोवा दौरा लोकांच्या स्मरणात आहे. ती एक नॉस्टॅल्जिक आठवण होती आणि ही सुद्धा तशीच झाली असती,” असे आलेमाव म्हणाले.
पोप यांच्या दौऱ्यात गोव्याचा समावेश व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन आलेमाव यांनी केले.
‘‘पोप फ्रान्सिस यांच्या भेटीमुळे आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही आनंदी होतो. पण भाजपच्या दोन्ही इंजिनांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आले आहे,’’ असे आलेमाव म्हणाले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, १९८६ मध्ये पोप जॉन पॉल (II) यांनी पणजीच्या कंपाल मैदानावर जाहीर प्रार्थना सभा साजरी केली होती आणि अनेकांना त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
‘‘गोव्यातील जनतेच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी डबल इंजिनमध्ये नेमका कुठे बिघाड झाला आहे, हे प्रमोद सावंत यांना माहित असावे आणि शक्य असल्यास पोप फ्रान्सिस यांना आपल्या राज्यात येणे शक्य व्हावे, यासाठी तातडीने पावले उचलावीत,’’ असे आलेमाव म्हणाले.
याबाबत सरकारने तातडीने उच्चाधिकार समितीची बैठक बोलावून चर्चा करावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे.
जुन्या गोव्यातील वारसास्थळांचे रक्षण करण्यातही सरकार अपयशी ठरले आहे असे ते म्हणाले.
‘सेव्ह ओल्ड गोवा अॅक्शन समिती’ने केलेल्या सूचना ऐकून घेऊन परिसरातील ऐतिहासिक अखंडतेचे रक्षण करावे. मास्टर प्लॅन जाहीर करावा आणि जागतिक वारसा स्थळावर येणारे प्रकल्प रद्द करावेत,’ असे आलेमाव म्हणाले.
तसेच जुन्या गोव्यातील वादग्रस्त बेकायदा बंगल्याबाबत सरकार अतिशय संथ गतीने काम करीत आहे अशी टीका त्यांनी केली.
‘‘भाजप सरकारने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषाच्या दहावार्षिक प्रदर्शना साठी ३०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. ती मंजूर झाली आहे काय की नाकारली आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे,’’ असे आलेमाव म्हणाले.

Trending

Exit mobile version