गोवा खबर:क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाचे संचालक श्री अरविंद खुटकर यांनी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, सांखळीने क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात युवकांसाठी आयोजित केलेल्या “युवाज्ञान – बुद्धीसाठी चालना” या एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना श्री खुटकर यांनी सहभागींना ज्ञान मिळविण्यासाठी आणि सकारात्मक सामाजिक बदलांना चालना देण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी नैतिक निवडींमध्ये आत्मनिर्णयाच्या महत्त्वावर भर दिला आणि एनएसएस दिनाचे महत्त्व प्रतिपादले. राज्य पातळीवरील सर्वोत्कृष्ट एनएसएस स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी आणि युनिटचा पुरस्कार लवकरच देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. “जगण्याची कला ही देणगी आहे असे त्यांनी सांगितले आणि त्यांनी तरुणांना त्यांच्या समुदायासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
चर्चासत्राचे समन्वयक श्री समीर प्रभू यांनी विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अशा चर्चासत्राचे महत्त्व नमूद केले.
प्रभारी प्राचार्या श्रीमती लीना चारी यांनी स्वागतपर भाषण केले.
अदिती शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीमती. हसिना शेख यांनी आभार मानले.