गोवा खबर : गोवा पर्यटन विभाग २० ते २२ सप्टेंबर या कालावधीत शेलेटन रिसॉर्ट, अल्बर्ट रोड, आयएनए कॉलनी, अमृतसर, पंजाब येथे होणाऱ्या इंडिया ट्रॅव्हल मार्ट (ITM) अमृतसर २०२४ या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम देशभरातील प्रवास उद्योगातील उद्योजक आणि भागधारकांना एकत्र आणेल. गोवा पर्यटनाला पर्यटन सेवांचे प्रदर्शन करण्यासाठी एक धोरणात्मक व्यासपीठ प्रदान करेल.
आयटीएम अमृतसर येथे गोवा पर्यटन विभाग शाश्वत आणि पुनर्संचयित पर्यटनावर विशेष लक्ष केंद्रित करून, सांस्कृतिक विविधता, विलोभनीय निसर्गसौंदर्य आणि नाविन्यपूर्ण पर्यटन सेवा सादर करेल. गोवा पर्यटन दालनास भेट देणाऱ्यांना बहुरंगी व बहुढंगी सण, राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा ते साहसपूर्ण संधी आणि समुद्रकिनारे अशा विविध आकर्षणांचे पदर उलगडण्याची संधी मिळेल.
या वर्षी नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांच्या जीर्णोद्धार आणि पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करून शाश्वततेच्या पलीकडे जाणारा दृष्टिकोन अर्थात ‘पुनर्संचयित पर्यटनासाठीची बांधिलकी’ या मध्यवर्ती संकल्पनेसह गोवा सहभागी होणार आहे. हे दालन स्थानिक समुदायांना फायदा मिळवून देण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने अंतर्गत भागातील प्रदेशांचा शोध (hinterland exploration), वारसा संवर्धन, आयुर्वेदासह वेलनेस टुरिझम आणि आध्यात्मिक पर्यटन, (बैठका, प्रोत्साहन, परिषद, प्रदर्शन) MICE आणि विवाह गंतव्यस्थान (wedding destination) यासारख्या प्रमुख उपक्रमांवर प्रकाश टाकेल.
गोव्यातील ११ ऐतिहासिक मंदिरांचा समावेश असलेला अध्यात्मिक मार्ग ‘एकादश तीर्थ सर्किट’, आणि आयकॉनिक बॅसिलिका ऑफ बॉम जिझस (iconic Basilica of Bom Jesus) येथे २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियरच्या बहुप्रतीक्षित प्रदर्शनासह आगंतुकांना अनोख्या अनुभवांचीही ओळख करून दिली जाईल. हे परस्परसंवादी प्रदर्शन गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करून जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा करत असलेले प्रयत्न विशद करेल.
गोवा पर्यटन विभागाचे संचालक आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC) चे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका, आयएएस, यांनी या कार्यक्रमावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “इंडिया ट्रॅव्हल मार्ट, अमृतसर हे गोव्यासाठी तिची पर्यटन क्षमता राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्याची एक उत्तम संधी आहे. पुनर्संचयित पर्यटनावरील आमचा भर, आमच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसाला टिकवून ठेवण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते. आम्ही अभ्यागतांना गोव्याची पर्यटन सेवा अनुभवण्यासाठी आमंत्रित करतो.’’
ते म्हणाले, “आयटीएम अमृतसरमध्ये गोव्यातील हॉटेलर्स, ट्रॅव्हल ऑपरेटर आणि उद्योगातील भागधारकांच्या सहभागामुळे पर्यटकांना गोव्यातील सर्वोत्कृष्ट पर्यटन सेवांचा लाभ मिळण्याची खात्री होते, यांमध्ये गोवा पर्यटन निवासावरील विशेष ऑफर देखील समाविष्ट आहेत. पर्यटकांना वैविध्यपूर्ण शोध घेण्यासाठी प्रेरित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गोव्याचे सौंदर्य राज्याच्या पर्यावरणीय आणि सामाजिक-आर्थिक स्थिरतेत योगदान देत आहे.
नवनिर्मितीला प्राधान्य देणाऱ्या पर्यटन पद्धती शोधण्यासाठी, कनेक्ट होण्यासाठी आणि त्यात गुंतण्यासाठी गोवा पर्यटन दालनामध्ये आमच्यासोबत सामील व्हा. कायमस्वरूपी सकारात्मक प्रभावांवर लक्ष केंद्रित करून गोवा पर्यटनाचे भविष्य कसे घडवत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या.