गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांचे मुख्य सचिवांना पत्र
गोवा खबर : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांना औपचारिक पत्र सादर करून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निम्न विभागीय लिपिक (LDC) पदांसाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. ही प्रक्रीया म्हणजे ‘नाेकरीसाठी पैशांची देवाण-घेवाण’ अशा प्रकारचा घाेटाळा असून या नोकर्या मिळवण्याच्या बदल्यात उमेदवारांकडून लाच मागितली गेली अाहे असा आरोप त्यांनी केला आहे.
पत्रात सरदेसाई यांनी तपशीलवार माहिती दिली की ऑक्टोबर 2023 मध्ये परीक्षेपासून सुरू झालेली भरती प्रक्रिया आणि त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये कौशल्य चाचणी भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. त्यांनी अधोरेखित केले की निकाल जाहीर करण्यास प्रदीर्घ सात महिन्यांचा विलंब झाला असला तरी, या कालावधीत उमेदवारांकडून कथितपणे पैसे वसूल करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. यावरुन पात्र उमेदवारांना डावलून त्या भलत्यानाच विकल्या गेल्या आणि पात्र उमेदवारांना वंचित ठेवले गेले. ज्यापैकी बरेच जण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
एका महिलेने उमेदवाराकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप करुन आपण हा मुद्दा महसूलमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित करूनही आपल्याला काही प्रतिसाद मिळालेला नाही. डिचोली पॉलिटेक्निकच्या दोन अधिकाऱ्यांचाही या घाेटाळ्यात सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यांच्यावर परीक्षेच्या निकालात फेरफार केल्याचा आरोप आहे असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
निकाल जाहीर करण्यास झालेला विलंब आणि संपूर्ण भरती प्रक्रियेच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरदेसाई यांनी या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. गुंतलेल्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज व्यक्त करतानाच या नोकर्या पात्र उमेदवारांनाच कशा मिळतील याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.