गोवा खबर : म्हापसा येथील नियती मळगावकर यांनी हल्लीच हैदराबाद येथे आयोजित मिसेस डेफ इंडिया २०२४ स्पर्धेत संपूर्ण गोव्यासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी बजावत स्पर्धेच्या विजेतेपदाचा मुकुट पटकावला.
हा पुरस्कार वैयक्तिक माझ्यासाठी आणि आजवर प्रत्येक पावलावर मला आधार, पाठबळ देणाऱ्या माझ्या कुटुंबियांसाठी अनमोल असा आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांत पुढे येऊन यशस्वी भरारी घेण्यासाठी डेफ व्यक्तींना माझ्या या कामगिरीतून नक्कीच प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे, अशी भावना नियती मळगावकर यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केली.
गोवा असोसिएशन ऑफ द डेफचे अध्यक्ष आणि कृषी विभागातील कर्मचारी गौरीश मळगावकर यांच्या नियती या पत्नी आहेत. जानेवारी-२०२३ मध्ये त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर नियती यांनी फॅशन स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे यासाठी पती तसेच कुटुंबियांकडून प्रोत्साहित करण्यात आले. गोवा असोसिएशन ऑफ द डेफचे संस्थापक व सरचिटणीस प्रसाद जोशी आणि पती गौरीश यांच्या पाठिंब्याने नियती यांनी मिसेस डेफ इंडिया २०२४ स्पर्धेसाठी अर्ज सादर केला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून नियती यांनी प्रथमच गोव्याबाहेरील उपक्रमात सहभाग घेतला होता.
नियती यांच्या विजयी कामगिरीचे कौतुक करताना राज्याचे दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, नियती, पाठिंबा देणारे त्यांचे कुटुंबीय आणि गोव्यातील आम्हा सर्वांसाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे. दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही क्षेत्रात चमक दाखवण्यासाठी नियतीच्या माध्यमातून आणखी एक प्रेरणास्थान मिळणार आहे. आपल्या स्वप्नांच्या वाटेत श्रवण मर्यादा त्यांनी येऊ दिली नाही.
या जेतेपदामुळे मला नवा आत्मविश्वास मिळाला आहे, प्रयत्न केले तर यश मिळते हे या कामगिरीतून मला जाणवले आहे. अनुभव आणि आत्मविश्वास मिळाल्याने धन्य पावल्याची अनुभूती मला मिळत आहे, असे नियती सांगतात.
पर्वरी येथील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नियती यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, गोवामध्ये बेकरी या विषयांत व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर घरातूनच त्यांनी बेकरीचा व्यवसाय सुरू केला आणि ग्राहकांच्या मागणीनुसार त्या स्पेशल केक पुरवतात.
नियती यांच्या मिसेस डेफ इंडिया २०२४ स्पर्धेतील या यशाबाबत गोवा असोसिएशन ऑफ डेफद्वारेही आनंद व अभिमान व्यक्त केला. आपल्या या यशामधून इतर डेफ महिलांना प्रेरणा मिळेल आणि आपले स्वप्न, उद्दिष्ट साकारण्यासाठी त्यांचे प्रयत्न वाढतील आणि त्या यशस्वी होतील, अशी भावना नियती यांनी व्यक्त केली.