गोवा खबर

जीएफडीसीचा १२ वा वर्धापनदिन व राष्ट्रीय क्रीडा सप्ताह साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यात फुटबॉलची भरभराट होण्यासाठी सर्व घटकांमध्ये सामंजस्य असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले.

बांबोळी येथील अ‍ॅथलेटिक स्टेडियममध्ये बुधवारी आयोजित गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (जीएफडीसी) बाराव्या वर्धापन दिन आणि सागच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय क्रीडा सप्ताहात ते बोलत होते.

जीएफडीसीचे प्रशिक्षक आणि कर्मचार्‍यांच्या गेल्या १२ वर्षांतील समर्पणाची दखल घेत श्री.  गावडे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व आणि युवा प्रतिभेला आकार देण्यासाठी प्रशिक्षकांची भूमिका अधोरेखित केली.

जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करतो तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने काहीतरी साध्य केले असे म्हणू शकतो. गोव्यातील खेळाला बळकटी देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या धडाडीच्या जोरावर गोव्यात फुटबॉलला अधिक उंचीवर नेण्यासाठी कायम प्रयत्नरत असलेले जीएफए अध्यक्ष डॉ. कायतानो फर्नांडिस यांचेही त्यांनी कौतुक केले.

Chowgule Industries Pvt Ltd. तर्फे गोमंतकीयांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!!!

क्रीडा सचिव श्वेतिका साचन यांनी जीएफडीसी आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाचे (साग) गेल्या १२ वर्षांपासून फुटबॉलच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन केले. गोव्यातील लोकांना या खेळाची तीव्र ओढ आहे. राज्यातील फुटबॉलच्या विकासात शिस्त, सांघिक कामगिरी आणि सहकार्य ही मूल्ये असणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

साचन यांनी गेल्या वर्षी गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल ‘साग’चे कौतुक केले. प्रास्ताविकात जीएफडीसीच्या सदस्य सचिव डॉ. गीता नागवेकर यांनी क्रीडामंत्र्यांचे राज्यातील क्रीडा विकासाच्या दृष्टीकोनाबद्दल आणि अखंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जीएफडीसी आणि सागचे सर्व कर्मचारी आणि प्रशिक्षकांनी वर्षानुवर्षे केलेल्या समर्पणाबद्दल त्यांनी या सर्वांचे आभार मानले.

’जीएफडीसी’ची ग्रामीण व शहरी भागात ३५ केंद्रे झाली असून, सध्या ७२ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली २२३८ प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत, असे डॉ. नागवेकर यांनी नमूद केले.
क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय (डीएसवायए), गोवा क्रीडा प्राधिकरण (एसएजी), गोवा फुटबॉल असोसिएशन (जीएफए) आणि जीएफडीसीच्या संघांमधील प्रदर्शनीय सामन्यांचाही या उत्सवात समावेश होता. जीएफएविरुद्धचा सामना (३-२) जिंकत एसएजीने विजेतेपद पटकावले.

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २९ जुलै २०१२ रोजी स्थापन केलेल्या जीएफडीसीची सुरुवात फुटबॉलला गोव्याचा अधिकृत खेळ म्हणून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि राज्यभरातील प्रतिभांना ग्रासरुट स्तरावर व्यासपीठ मिळावे या उद्देशाने करण्यात आली होती. यावेळी जीएफएचे अध्यक्ष डॉ. कायतानो फर्नांडिस, सागचे संचालक (प्रशासन) केदार नाईक हे देखील उपस्थित होते.

Trending

Exit mobile version