गोवा खबर : पोस्टमास्टर जनरल गोवा विभागाच्या वतीने दिनांक 30 रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्टर जनरल कार्यालय, पणजी येथे 59 व्या प्रादेशिक स्तरीय डाक अदालतीचे आयोजन केले आहे.
ज्या प्रकरणांचा 6 आठवड्यांच्या आत निपटारा झाला नाही अशा गोवा विभागाशी संबंधित पोस्टल सेवांबाबतच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी या डाकअदालतमध्ये विचारात घेतल्या जातील. टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डर न पोहचण्यासंबंधीच्या तक्रारींचा यात विचार केला जाईल. तक्रारीत ज्या अधिकाऱ्यांना मूळ तक्रार पाठवण्यात आली त्यांच्या तारखा, नावे आणि पदनाम इत्यादी तपशील असावेत. इच्छुक ग्राहक, टपाल सेवांबाबत त्यांची तक्रार सहाय्यक संचालक पोस्टल सेवा-1, ओलो पोस्टमास्टर जनरल, गोवा प्रदेश, पणजी – 403001यांच्याकडे सत्यप्रतीमध्ये पाठवू शकतात. तक्रारी दाखल करण्याची शेवटची तारीख 19.09.2024 आहे.
टपाल सेवा देशाच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग असून ही सेवा अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला स्पर्श करते. टपाल विभाग आपल्या ग्राहकांना पूर्ण समाधानी सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, संवादातील अंतर आणि सेवा दोष अधूनमधून घडतात, ज्यामुळे तक्रारी वाढतात, यांची टपाल विभागाला जाणीव आहे. अशा तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी, विभाग वेळोवेळी अदालतीचे आयोजन करतो. या अदालतीत विभागाचे अधिकारी संबंधीत ग्राहकांना भेटून, त्यांच्या तक्रारींचा तपशील गोळा करतात आणि लवकरात लवकर त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतात.