-
दिशाभूल करणारी जाहिरात तात्काळ बंद करण्याचा आदेश
गोवा खबर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2022 संदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात केल्या प्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) शंकर आयएएस अकादमी विरोधात कारवाईचा आदेश जारी केला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त म्हणू अनुपम मिश्रा जबाबदारी सांभाळत आहेत.
दिशाभूल करणारी जाहिरात केल्या प्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आयएएस अकादमीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एक महत्वाचा घटक या नात्याने ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने तसेच कोणत्याही वस्तू अथवा सेवांबद्दल, कोणत्याही प्रकारची खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात करून ग्राहक संरक्षण कायदा, 2019 तरतुदींचे उल्लंघन करण्याच्या वृत्तीला आळा बसावा या उद्देशानेच हा निर्णय घेतल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 18 मधील तरतुदींनुसार, कोणत्याही वस्तू किंवा सेवांच्या संदर्भात कोणतीही खोटी किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून, या कायद्यातील तरतुदींचे किंवा त्या अंतर्गत बनवलेल्या नियम तसेच नियामक तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची खातरजमा करण्याचे अधिकार केंद्रीय ग्राहक संरक्षण केंद्राकडे आहेत.
शंकर आयएएस अकादमीने दिलेल्या जाहिरातीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 संदर्भात खाली नमूद दावे केले आहेत-
- 1. अखिल भारतीय स्तरावर 933 पैकी 336 जणांची होणार निवड
- 2. सर्वोत्कृष्ट 100 उमेदवारांमध्ये 40 उमेदवार
- 3. तामिळनाडूमधून 42 उमेदवार उत्तीर्ण झाले, त्यापैकी 37 जणांनी शंकर आयएएस अकादमीमधून शिकवणी घेतली
- 4. भारतातील सर्वोत्कृष्ट आयएएस अकादमी
शंकर आयएएस अकादमीने विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची जाहिरात केली होती. मात्र वर नमूद केलेल्या जाहिरातीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या निकालात, यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची माहिती जाणीवपूर्वक लपविण्यात आली होती असे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला या जाहिरातींच्या परिक्षणांमध्ये आढळून आले.
या सोबतच या जाहिरातीचे परिक्षण करताना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला असेही अशी 18 प्रकरणेही आढळून आली, ज्यात, उमेदवारांनी शंकर आयएएस अकादमीमधून प्रारंभिक अभ्यासक्रम (Preliminary course) खरेदी केला आहे, आणि त्यांच्या पावतीवर 09 ऑक्टोबर 2022 ही तारीख अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख म्हणून नमूद केली आहे, मात्र प्रत्यक्षात केद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा 2022 साठीची पूर्व परीक्षा 05 जून 2022 रोजी पार पडली होती आणि त्या परीक्षेचा निकालही 22 जून 2022 रोजी जाहीर केला गेला होता.
ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 2 (28) (4) मध्ये महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दलची व्याख्या स्पष्टपणे केली गेली आहे. त्यानुसार या अकादमीने दिलेल्या जाहिरातीत यशस्वी झालेल्या उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची माहिती ग्राहकांनाही देणे महत्वाचेच ठरते.