गोवा खबर : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पृथ्वी भवन येथे अमेरिका-भारत नागरी आण्विक वाणिज्य विषयक महत्त्वाची द्विपक्षीय बैठक झाली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या बाबतीत भारत आणि अमेरिकेमधील दृढ होत असलेल्या परस्पर सहकार्याच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
गगनयान मोहिमेतील एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सामील होणार असल्याची मोठी घोषणा डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी केली. ही घटना भारत आणि अमेरिकामधील अंतराळविषयक परस्पर सहकार्यातील महत्वाचा मैलाचा दगड असेल असे सिंह म्हणाले. जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांमध्ये, विशेषत: आज परस्परांसोबत जोडलेल्या जगात सेमीकंडक्टर्स, औषधविषयक उत्पादने आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान यांसारख्या अत्यावश्यक झालेल्या क्षेत्रांच्या दृष्टीने दोन्ही देशांमधली ही भागीदारी महत्त्वाची असल्याची बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हरित हायड्रोजन अभियान हे अवजड उद्योग, वाहतूक आणि वीज निर्मिती क्षेत्र कार्बन उत्सर्जन मुक्त करण्याच्या भारताच्या धोरणाचा महत्वाचा पाया असल्याची बाबही अधोरेखित केली. स्वच्छ उर्जाविषयक तंत्रज्ञानात नवोन्मेष आणण्यासाठी तसेच हवामानविषयक जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी या बैठकीत मांडले. भक्कम धोरणात्मक आराखडा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून भारत शाश्वत आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकणारे उर्जा क्षेत्र निर्माण करण्याच्या भवितव्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भारत सज्ज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आंतरराष्ट्रीय हवामान धोरणविषयक वरिष्ठ सल्लागार जॉन पोडेस्टा आणि अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचे उपमंत्री डेव्हिड टर्क यांनी या बैठकीत सहभागी झालेल्या अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी आर्थिक विकास, राष्ट्रीय सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीच्या बाबतीत जगाचे नेतृत्व करण्याची संधी साधता यावी या दृष्टीने परस्पर हितसंबंधांसह उदयोन्मुख तंत्रज्ञानामधले परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.