गोवा खबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये काल नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर भारताने पाठवलेले ‘विक्रम’ लँडर यशस्वी उतरले होते. अंतराळ क्षेत्रामध्ये भारताने घडवलेली ही ऐतिहासिक घटना साजरी करण्यासाठी देशात आज राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जात आहे. याप्रसंगी राष्ट्रपतींनी ‘रोबोटिक्स चॅलेंज’ आणि ‘भारतीय अंतरीक्ष हॅकेथॉन’ विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले.
राष्ट्रपती म्हणाल्या, प्रारंभापासून इस्रोचा प्रवास शानदार राहिला आहे. अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.यासोबतच इस्रोने देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातही अमूल्य योगदान दिले आहे. संशोधकांनी कमीत कमी संसाधनांचा वापर करून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला जगातील सर्वोत्तम अंतराळ कार्यक्रमांमध्ये स्थान देणाऱ्या समर्पित शास्त्रज्ञांचे राष्ट्रपती मुर्मू यांनी कौतुक केले. आपला देश अंतराळ विज्ञानात सातत्याने प्रगती करेल आणि आपण उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही महिन्यांपूर्वीच एका भारतीय कंपनीने ‘सिंगल-पीस थ्रीडी प्रिंटेड सेमी-क्रायोजेनिक इंजिन’ वर चालणारे रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित केल्याचे पाहिल्यावर आपल्याला आनंद झाला, ही अशी पहिलीच कामगिरी आहे. भविष्यातील आव्हानांसाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल, असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
अंतराळ संशोधन उपक्रमांची निरंतर प्रगती सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘सुरक्षित आणि शाश्वत मोहीम व्यवस्थापनासाठी इस्रो कार्यप्रणाली’ सुविधेचे त्यांनी कौतुक केले. 2030 पर्यंत भारत आपल्या सर्व अंतराळ मोहिमा कचरामुक्त करण्यासाठी कार्यरत आहे, हे जाणून आपल्याला आनंद झाल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.