- विजय सरदेसाई यांची मागणी : मुख्य सचिवांना पत्र
गोवा खबर : चतुर्थीसाठी गोव्याबाहेरून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. त्यामुळे या मूर्ती विसर्जनानंतर गोव्यातील जलसाठ्यांचे प्रदूषण होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन अशा मूर्ती राज्यात आणण्यावर निर्बंध आणावेत, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.
त्यासंबंधी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात गोव्यात आणल्या जाणार्या प्रत्येक मूर्तीची नोंंद ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात सरदेसाई यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेस आणला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशा पर्यावरण हानीकारक मूर्ती राज्यात येऊ नयेत यासाठी राज्याच्या सीमांवर पथके तैनात करणार, असे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देताना सरदेसाई यांनी अशा मूर्ती गोव्यात येऊ नयेत यासाठी गोव्यात येणार्या प्रत्येक मूर्तीची तपासणी करून त्याची नोंद करुन घ्यावी, या मूर्ती तयार करणारे उत्पादक, गोव्यात पुरवठा करणारे पुरवठादार तसेच त्यांची वाहतूक करणार्या वाहतूकदारांची माहिती नोंदवून घ्यावी, जेणेकरून विसर्जनानंतर या मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असल्यास या सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
सरकारने गोव्यात जे चिकण मातीच्या मूर्ती करतात त्या कारागिरांना प्रोत्साहन देण्याची गरज असून अशा कारागिरांच्या मूर्तींना ग्राहक मिळावे यासाठी हस्तकला महामंडळाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सुचवले.
या कारागिरांच्या मूर्तींसाठी युनिक बारकोड किंवा क्यूआर कोड देऊन या कारागिरांच्या मूर्तींना बाजारपेठ उपलब्ध होईल याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. गोव्यात आयात करून आणल्या जाणार्या मूर्तींबाबत सरकारने काटेकोरपणे माहिती संकलन करावी, अशी मागणी त्यांनी केली.