गोवा खबर : जगातील अनेक लोकशाही प्रगल्भ होण्यास वेळ लागला आहे परंतु भारतीयांनी आपल्या राष्ट्राप्रती दृढ समर्पणाने आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे सिद्ध केले आहे. स्वातंत्र्य मिळविताना अनेकांनी केलेले अनुमान खोडून काढले आहे, असे प्रतिपादन वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. चिखली वास्को येथे ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सुरवातीस मंत्र्यांनी तिरंगा फडकविला आणि गोवा पोलिसांनी सादर केलेल्या संचलनाची आणि सलामीची पाहणी केली. आपण आपला स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना आपल्या देशातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे मंत्री म्हणाले. विविधतेतील आपली एकता ही आपल्या राष्ट्राची सर्वात मोठी ताकद आहे ज्याची आपण गेल्या ७८ वर्षांपासून बोलत आहोत. केंद्रात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि विविध सुधारणा आणि धोरणे, व्यवसाय सुलभतेमुळे आपले राष्ट्र जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्याच्या मार्गावर आहे असे त्यांनी सांगितले. आपले राष्ट्र मानवी प्रयत्नांच्या विविध क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करीत आहे, असेही मंत्री म्हणाले.
या उत्सवाचे औचित्य साधण्यासाठी क्रीडा व युवा संचालनालयातर्फे १०-१२ आणि १३-१६ वयोगटातील मुला-मुलींसाठी राज्यस्तरावर विविध वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रोप-स्किपिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग मिळाला.
१०-१२ वयोगटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते अनुक्रमे मिस झोया हुसैन मिस आलिया हुसेन, मिस आराध्या गुप्ता आहेत. त्याच वयोगटातील मुलांमध्ये मारुती लमाणी आणि, सोलोमोनो गुडलाना, उत्कर्ष बिंद यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला, तर १३ ते १६ वयोगटात मुलींच्या गटात मिस साईशा लमाणी आणि मिस संजना जैस्वार, मिस कावेरी लमाणी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. त्याच वयोगटातील मुलांमध्ये रुद्र सरोज, शुभम कुडतरकर, लक्ष्मण यादव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व विजेत्यांना मंत्री महोदयांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. केशव स्मृती बालविकास हायस्कूल व मुरगाव हायस्कूल हेडलँड सडा यांनी सांस्कृतिक नृत्य सादर केले. तर केशव स्मृती हायस्कूल, आणि अवर लेडी ऑफ कँडेलेरिया हायस्कूल, सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
मिशन क्लीन वास्कोला प्रोत्साहन देण्यासाठी विविध गृहनिर्माण संस्थांच्या भागधारकांना योग्य कचरा व्यवस्थापनासाठी रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय मलनिस्सारण प्रक्रिया कामगारांचाही मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर, आमदार मुरगाव संकल्प आमोणकर, उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी, उपसंचालक पंचायत प्रशीध्द नाईक, मामलेदार प्रवीण पंडित, मुरगांच्या नगराध्यक्षा श्रीमती अनिता थोरात, जि.प. संदीप सूद, संयुक्त मामलेदार सीमा गुडेकर, चिखलीचे सरपंच कमला प्रसाद यादव वास्कोचे सरपंच ऐश्वर्या कोरगावकर, बोगमाळोचे सरपंच लोरेना डिकुन्हा, स्थानिक नागरिक, मामलेदार कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.