गोवा खबर : कृषी मंत्री रवी नाईक यांनी क्रांती मैदान, फोंडा येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रध्वज फडकविला आणि नंतर पोलीस दलाकडून संचलनाची पाहणी केली.
यावेळी बोलताना रवी नाईक यांनी स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींसह स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करताना ब्रिटीश राजवटीमुळे देशाचा विकास थांबला तर गोमंतकीयांना पोर्तुगीजांच्या अत्याचाराचा सामना करावा लागला असे सांगितले. अखेर १५ ऑगस्टला आपला देश इंग्रजांपासून मुक्त झाला आणि आज स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपण स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान विसरता कामा नये असे ते म्हणाले.
आपला देश वेगाने विकसित होत आहे, परंतु जाती आणि धर्मांमध्ये विभागलेला आहे आणि इच्छित लक्ष्य साध्य करण्यात हा मोठा अडथळा आहे याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की भारताला जगातील विकसित राष्ट्रांपैकी अव्वल बनविण्यासाठी लोकांनी धर्म आणि जातीची पर्वा न करता एकत्र येणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी फोंडा नगरपालिकेचे अध्यक्ष आनंद नाईक, स्वातंत्र्यसैनिक, कमांडिंग ऑफिसर ६ टीटीआर, फोंडा, कर्नल जसविंदर सिंग, जि.प.चे सदस्य, सरपंच, नगरसेवक, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, नागरिक, सरकारी अधिकारी आणि विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
सुरवातीस कृषी मंत्र्यांचे क्रांती मैदानावर आगमन झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी शुभम नाईक यांनी स्वागत केले. गिरीश वेळगेंकर यांनी सूत्रसंचालन केले.