गोवा खबर : पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना विद्यार्थी समुदायाला ड्रग्ज आणि इतर व्यसनांसारख्या सर्व वाईट प्रवृतीवर मात करून समाजाला अभिमान वाटेल अशा अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले.
मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर ते लोकांसमोर बोलत होते. मंत्री सिक्वेरा यांनी पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे असे सांगितले. समता आणि बंधुत्वाच्या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सिक्वेरा यांनी स्वातंत्र्यदिन हा केवळ एक दिवस नसून तो लोकशाही, एकता आणि सार्वभौमत्वाच्या तत्त्वांचा उत्सव आहे असे सांगितले. हा उत्सव स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लढाया, भारतातील ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महान नेत्यांनी केलेले बलिदान दर्शवितो. आपला भूतकाळ पाहण्याची आणि समृद्ध देशासाठी आपली दृष्टी पाहण्याची हीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला महासत्ता बनविण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी झटत आहेत असे ते म्हणाले.
नावेलीचे आमदार उल्हास तुयेंकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू, आयएएस, पोलीस अधिक्षक, दक्षिण गोवा सुनीता सावंत व इतर यावेळी उपस्थित होते. होली स्पिरिट इन्स्टिट्यूट, महिला नूतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी यावेळी देशभक्तीपर गीते सादर केली.