गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनाच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी लोकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या महान त्यागाचे आपण स्मरण करत असताना त्यांनी आपल्या देशाला परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी राष्ट्रभक्तीच्या भावनेतून केलेल्या अथक प्रयत्नांना नमन करूया, असे मुख्यमंत्री म्हणतात.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वातंत्र्य दिवस हा आपल्या इतिहासाकडे पाहण्याचा एक प्रसंग आहे. स्वातंत्र्यदिन आपल्याला आठवण करून देतो की आपण केवळ व्यक्ती नाही तर आपण महान देशाच्या समाजाचा एक भाग आहोत. भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि प्राचीन काळापासून आपल्याकडे तळागाळात लोकशाही संस्था कार्यरत होत्या. पण दीर्घ वर्षांच्या वसाहतवादी राजवटीमुळे लोकशाही व्यवस्थेच्या कार्यात खंड पडला. राष्ट्रभक्त नेते आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे १५ ऑगस्ट १९४७ साली देश स्वातंत्र झाला आणि नवीन पर्वाची सुरवात झाली. आपण केवळ परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवले नाही तर आपले नशीब नव्याने घडविण्याचे स्वातंत्र्यही मिळविले आहे.
हे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या राष्ट्राला शांतता आणि समृद्धीच्या भविष्याकडे वाटचाल करण्याची संधी देतो. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा विकास होण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजे. आपल्या देशाची ताकद ही आमचा समृध्द वारसा आणि सांस्कृतिक परंपरेत आहे. आजच्या यादिनी आम्ही आमच्या महान आणि सुंदर राष्ट्रास नमन करतात. आत्मनिर्भरतेच्या भावनेतून लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागेल आणि देशाला पुढे जाण्यास मदत होईल.
या स्वातंत्र्यदिनी, आमच्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग केलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी मी माझ्या सहकारी नागरिकांमध्ये सामील होतो. आम्ही आपला भूतकाळ लक्षात ठेवूया, आपल्या नेत्यांना नमन करूया आणि परिपूर्ण भविष्य घडविण्यासाठी कटिबध्द होऊया.
आपला तिरंगा साजरा करण्याची परंपरा कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा प्रत्येक भारतीयाला हर घर तिरंगा या देशव्यापी चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सर्वानी या मोहिमेत सहभागी होऊन देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी कटीबद्द होऊया, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.