गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह वीज मंत्री श्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनी गोव्यातील लोकांच्यावतीने गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. श्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. मीरामार येथील बांदोडकरांच्या समाधीस्थळावर मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी मुख्य सचिव श्री पुनीत कुमार गोयल, आयएएस, प्रधान सचिव वित्त, डॉ. व्ही. कांदेवेलू आयएएस, डीजीपी गोवा श्री अलोक कुमार आयपीएस, आयजीपी, श्री ओमवीर सिंग बिश्नोई आयपीएस, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री कमल दत्ता, आयएफएस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा गीते आयएएस, मुख्य वनसंरक्षक श्री उमाकांत, आयएफएस आणि सरकारचे इतर सचिव, बांदोडकर यांचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
बांदोडकर यांच्या समाधीस्थळाच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. समाधीस्थळाच्या देखभालीसंदर्भातील चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी समाधीस्थळाच्या देखभालीसाठी सर्व पावले उचलली जातील असे आश्वासन दिले.
तद्नंतर मुख्यमंत्र्यांनी जुन्या सचिवालयात भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि नंतर पर्वरीतील सचिवालय येथे गोव्याच्या माजी नेत्याला पुष्पहार अर्पण केला.