- • नुकत्याच संपन्न झालेल्या स्वयंपूर्ण गोवा सीएसआर परिषद २०२४ मध्ये शिरोडा मतदारसंघातील स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाची अधिकृत घोषणा
गोवा खबर : गोवा सरकारद्वारे भारत सीएसआर नेटवर्कसमवेत सहकार्य करार करत शिरोडा मतदारसंघामध्ये स्मार्ट व्हिलेज प्रकल्प सुरू केला आहे. ही ऐतिहासिक घोषणा नुकत्याच संपन्न झालेल्या स्वयंपूर्ण गोवा सीएसआर परिषद २०२४ मध्ये करण्यात आली. स्मार्ट व्हिलेज प्रकल्प हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचा प्रमुख घटक आहे.
अत्याधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, सुलभ आरोग्यसेवा आणि शाश्वत ऊर्जा उपायांद्वारे राज्यातील ग्रामीण समुदायांमध्ये परिवर्तन घडवून आणणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी शिरोडा मतदारसंघाचे आमदार व जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, म्हापसा मतदारसंघाचे आमदार तसेच विधानसभेतील उपसभापती जोशुआ डिसोझा, राज्य शिक्षण संचालक शैलेश सिनाई झिंगडे, राज्य जलसंपदा संचालक (प्रशासन) तसेच स्वयंपूर्ण गोवा उपक्रमासाठीचे तालुका नोडल अधिकारी गौरेश कुर्टीकर, भारत सीएसआर नेटवर्कचे संस्थापक चेअरमन डॉ. साजिद सय्यद, राज्य नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन संचालनालयाचे उपसंचालक डॉ. कैलास दिगंबर गोखले, उत्तर गोवा जिल्हा पंचायतचे सदस्य व हरमलचे प्रतिनिधी रंगनाथ कलशावकर, बेतोडा-निरंकाल ग्रामपंयातीचे संयोजक/स्वयंपूर्ण मित्र चंद्रकांत शेटकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, स्वयंपूर्ण मित्र आणि प्रमुख भागधारकांचाही सहभाग होता.
शिरोडकर म्हणाले, स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांतर्गत गोव्यातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज व्हावे यासाठी भारत सीएसआर नेटवर्कशी सहकार्य करताना मला आनंद होत आहे. या परिवर्तनीय प्रकल्पाची सुरुवात करणारा माझा मतदारसंघ शिरोडा हा पहिला मतदारसंघ म्हणून निवडला गेल्याने मला खूप आनंद आहे. या उपक्रमाचे फायदे निःसंशयपणे गावातील लोकांचे जीवनमान उंचावतील, उज्ज्वल, अधिक शाश्वत भविष्यासाठी मार्ग खुला करतील. शिरोडा मतदारसंघात आम्ही राबवत असलेल्या विकासकामांमुळे येथील नागरिकांचे जीवनमान सुधारेल तसेच राज्यभरात ग्रामविकासाचा मापदंडही निर्माण होईल.
डिसोझा म्हणाले, स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांतर्गत स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाला पाठिंबा देताना मला खूप अभिमान वाटतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून असल्याने, त्याचे फायदे गावांसह राज्याच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. ही बाब प्रत्यक्षात आणण्यासाठी गोवा सरकारने भारत सीएसआर नेटवर्कसोबत सहकार्य करार करत स्मार्ट व्हिलेज प्रकल्प राबवण्यास सुरवात केली ही घटना एक परिवर्तनकारक पाऊल आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील अतिदुर्गम गावांनाही डिजिटल युगात विकास आणि समृद्धीसाठी आवश्यक साधने आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होतील.
गोवा सरकारच्या दूरदर्शी स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाचा भाग होण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे, जो स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत प्रत्येक गावाच्या उन्नतीसाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या उपक्रमासाठी राज्याचे समर्थन उल्लेखनीय आहे. गोव्यामध्ये अशा प्रकारचा परिवर्तनशील उपक्रम राबवण्यासाठी महत्वाचे योगदान दिलेले मुख्यमंत्री यांच्याप्रती मी आभार व्यक्त करू इच्छितो. तसेच हा प्रकल्प सुरू करण्यात मोठे योगदान राहिलेले शिरोडकर आणि डिसोझा, कुर्टीकर आणि चंद्रकांत शेटकर यांच्याप्रतीही मी आभार व्यक्त करू इच्छितो. हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले असून यामुळे गोव्यातील ग्रामीण समुदायांवर त्याचा दूरगामी प्रभाव पडणार आहे, असे
सय्यद यांनी सांगितले.
स्मार्ट व्हिलेज प्रकल्प ग्रामीण समुदायांमध्ये विकासाच्या व्यापक दृष्टिकोनासह परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी शिक्षण आहे. भविष्यासाठी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिरोड्यामध्ये स्मार्ट स्कूलच्या उभारणीसह आधुनिक सुविधा आणि नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती असतील. सर्व रहिवाशांना मोफत वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी आरोग्यम सेवा केंद्राची स्थापना करण्यात येईल. स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जासुरक्षेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रकल्पामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पातून शाश्वत विकासावर भर दिला जाईल. कौशल्य विकास आणि मायक्रो-फायनान्सिंग संधींच्या माध्यमातून सामुदायिक सक्षमीकरणाला चालना देऊन स्थानिक प्रदेशाच्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरा बसवून वाय-फाय हॉटस्पॉट्सच्या माध्यमातून वर्धित सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. याशिवाय, गोव्यातील युवा विकास व कल्याणासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्याने, क्रीडा मैदाने आणि व्यायामशाळा यासह आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे.
शाश्वत ग्रामीण विकासाचे मॉडेल तयार करण्यासाठी शिरोडा मतदारसंघातील स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रगत पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, कार्यक्षम आरोग्य सेवा आणि नवीकरणीय ऊर्जा उपायांचे एकत्रीकरण करणे हा आहे. हा प्रकल्प केवळ स्थानिक समुदायाचेच उत्थान करणार नाही तर देशभरातील ग्रामीण विकास उपक्रमांसाठी एक मापदंड देखील स्थापित करणार आहे.