गोवा खबर

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदीचे कठोरतेने पालन करा :हिंदु जनजागृती समिती

Published

on

Spread the love



गोवा खबर: राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी असूनही प्रतिवर्ष राज्यातील काही ठिकाणी अशा मूर्तींची विक्री होत असते. काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना वरून मातीचा थर देऊन त्यांचीही विक्री केली जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाण्यावर तरंगतात. त्यातून श्री गणेशाची विटंबना होते. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नदी, तलाव आदींमध्ये प्रदूषण होते. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदीचे कठोरतेने पालन करावे आणि श्री गणेशाची पवित्रके आकृष्ट करून त्याद्वारे अधिकाधिक चैतन्य देऊ शकणार्‍या शाडू मातीच्या श्री गणेशाच्या मूर्तींच्या विक्रीस प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते (आय.ए.एस्.) यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये ’जनहित समिती’चे सर्वश्री जंग बहादूर चौहान, हिंदु जनजागृती समितीचे सुशांत दळवी आणि राज बोरकर आणि सनातन संस्थेचे महेश प्रभू यांची उपस्थिती होती.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी
हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने या वेळी अन्य एका निवेदनाद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करणे, जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करणे आणि सर्व शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवण्यासाठी शासनाने निर्देश देणे अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Trending

Exit mobile version