गोवा खबर : हातमाग उत्पादने हा पंतप्रधानांच्या ‘बी व्होकल फॉर लोकल’, या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या उपक्रमाचा प्रमुख घटक असून,‘स्वदेशी चळवळी’च्या खऱ्या भावनेने हातमाग उत्पादनांचा प्रसार करायला हवा, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात काल 10 व्या राष्ट्रीय हातमाग दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले, आर्थिक राष्ट्रवाद हा देशाचा आर्थिक विकास आणि आर्थिक स्वातंत्र्याचा प्रमुख आधारस्तंभ आहे. हातमागाचा प्रचार करणे ही काळाची गरज आहे, देशाची गरज आहे आणि हवामान बदलाच्या दृष्टीने पृथ्वी ग्रहाची गरज आहे.
रोजगार निर्मितीमध्ये विशेषतः ग्रामीण महिलांसाठी हातमागाचे महत्व अधोरेखित करत अशा उत्पादनांसाठी पुरेशा विपणन सुविधा सुनिश्चित करायला हव्यात, असे उपराष्ट्रपती म्हणाले. त्यांनी भारतातील कॉर्पोरेट्सना, विशेषत: हॉटेल उद्योगाला हातमाग उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे आवाहन केले.
काही जण राष्ट्रीय हितापेक्षा मर्यादित आर्थिक लाभाला प्राधान्य देतात, याबद्दल चिंता व्यक्त करत हा आर्थिक फायदा टाळता येऊ शकणार्या आयातीसाठी पर्याय ठरू शकतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देशांतर्गत उत्पादनांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने 7 ऑगस्ट 1905 रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत उपराष्ट्रपती धनखड यांनी स्वदेशी चळवळीच्या 110 व्या वर्धापन दिनानिमित्त 2015 मध्ये 07 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून घोषित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी निर्णयाची प्रशंसा केली.
वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.