गोवा खबर

मांद्रे पंचायतक्षेत्रात आमदारांनी राजकारण आणू नये : प्रशांत नाईक

Published

on

Spread the love

गोवा खबर : मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. केवळ मांद्रे पंचायत क्षेत्रामध्ये राजकारण आणून विकासाला खो घालू नये किंवा एकमेकांमध्ये भांडणे लावण्याचाही प्रयत्न करू नये. असे चालूच राहिले तर एक दिवस सगळी प्रकरणे आम्ही उघड्यावर आणू, असा इशारा मांद्रे सरपंच बाळा ऊर्फ प्रशांत नाईक आणि माजी सरपंच तथा विद्यमान पंच अ‍ॅडवोकेट अमित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मांद्रे पंचायत क्षेत्रातील जे प्रमुख रस्ते आहेत, त्यावरून वीज भूमिगत केबल घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने खात्याच्या सहकार्यातून रस्ते मधोमध खणले होते. परंतु पावसाळ्यापूर्वी त्याची दुरुस्ती केली नाही. आस्कावाडा-मांद्रे येथील ज्या ठिकाणी उपसरपंच म्हणून तारा हडफडकर राहतात त्यांच्या समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्या ठिकाणी किमान दहा जणांना अपघात होऊन दुखापत झाली. एका व्यक्तीचा बळीही गेला. त्याची दखल घेत हडफडकर यांनी ज्यावेळी पंचायत मंडळाची बैठक होती त्या बैठकीत रस्त्यासंदर्भात कैफियत मांडली. आपणही आमदार आरोलकर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना या रस्त्याची डागडुजी करण्याविषयी वारंवार विचारणा केली. परंतु कोणीच दखल घेतली नाही, अशी कैफियत हडफडकर यांनी मांडली. त्यानंतर पंचायत मंडळांनी पत्रकार परिषद घेऊन जर सरकारने अर्थात सार्वजनिक बांधकाम खात्याने 24 तासांच्या आत खड्डे बुजवले नाही तर स्वतः पंचायत पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवेल, असा इशारा दिला. मात्र हडफडकर यांनी आरोलकर यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून प्रतिक्रिया देऊन पंचायतीची ही दिशाभूल केल्याचा दावा सावंत यांनी केला.

मांद्रे मतदारसंघात आणि पर्यायाने किनारी भागात सीआरझेडचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही बांधकामे मोडली जाणार आहेत किंवा त्यांना अभय देण्यासाठी त्या त्या भागातील आमदार प्रयत्न करत आहेत. परंतु मांद्रे मतदारसंघाच्या किनारी भागाचा विचार केला तर एक तरी बिल विधानसभेच्या अधिवेशनात आणले आहे का, असा प्रश्न सावंत यांनी यावेळी उपस्थित केला.

ज्या पद्धतीने पंचायत मंडळांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला इशारा दिला त्यानंतर 24 तासांच्या आत मांद्रे पंचायत क्षेत्रातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले. हे काम सुरू असतानाच आमदारांची काही माणसे घटनास्थळी जाऊन चित्रिकरण आणि छायाचित्रे घेऊन ती परस्पर प्रसार माध्यमाकडे देऊन या कामांचे श्रेय लाटत आहेत, असा आरोप नाईक यांनी केला.

मांद्रे सच्चे भाटले ते पार्सेपर्यंत जाणार्‍या रस्त्यावर रात्रीच्या वेळी विजेची सोय नव्हती. त्यासाठी पंचायतीनेही पुढाकार घेऊन आमदारांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी विजेची सोय केली. परंतु आमदारांनी स्थानिक पंचायतीला विश्वासात न घेता मांद्रे पंचायत क्षेत्रात या विजेचे उद्घाटन करण्याऐवजी पार्सेमध्ये का केले, असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला.

Trending

Exit mobile version