गोवा खबर

पत्रकारिता आणि लेखनात राष्ट्र आणि समाज घडवण्याचे सामर्थ्य : बांदेकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : पत्रकारिता आणि लेखनात राष्ट्र आणि समाज घडवण्याची ताकद आहे. त्यांचा वापर जबाबदारीने आणि प्रभावीपणे होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 104 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

गोवा पत्रकार संघ आणि गोवा मराठी पत्रकार संघाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

बांदेकर यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रांची स्थापना आणि सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करण्यामध्ये टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकला. आज सार्वजनिक गणेश उत्सवा सारख्या कार्यक्रमाचा वापर समाजाच्या विकासासाठी होण्याची गरज आहे, असेही बांदेकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देसाई यांनी पत्रकारितेतील परिवर्तन आणि सोशल मीडियाचा प्रिंट मीडियावरील वाढता प्रभाव यावर चर्चा केली. मुद्रित माध्यम कमाईवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. जनतेला माहिती देणे आणि सत्य बातम्या देणे या पारंपरिक पत्रकारितेच्या तत्त्वांशी तडजोड वाढत आहे, असे ते म्हणाले.

मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या तसबिरीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. गोवा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत संभाजी यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गावडे यांनी केले तर गोवा मराठी पत्रकार संघाचे सचिव सुभाष नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

Trending

Exit mobile version