गोवा खबर : माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे अधिकारी प्रकाश नाईक यांना सेवानिवृत्ती निमित्ताने खात्याच्या कर्मचार्यांनी काल निरोप दिला. नाईक यांनी या खात्यामध्ये माहिती साहाय्यक, साहाय्यक माहिती अधिकारी आणि माहिती अधिकारी म्हणून 35 वर्षे सेवा बजावली. नाईक हे 30 जून 1989 वर्षी माहिती साहाय्यक म्हणून खात्याच्या सेवेत रूजू झाले होते.
माहिती संचालक दीपक बांदेकर यांनी नाईक हे खात्यातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी असून त्यांनी खात्यांमध्ये विविध पदांवर दिलेल्या सेवेची प्रशंसा केली. बांदेकर यांनी नाईक यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सदस्य असल्याबद्दल तसेच त्यांच्या उल्लेखनीय लेखन कौशल्याबद्दल कौतुक केले. नाईक निवृत्त होत असले तरी त्यांची लेखणी निवृत्त होणार नाही, असे सांगून त्यांना आनंदी आणि निरोगी सेवानिवृत्तीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.
नाईक यांनी नवी दिल्लीत होणार्या प्रजासत्ताक दिन संचलन, आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा अशा अनेक कार्यक्रमांमध्ये गोवा सरकारचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी खात्यात दक्षता अधिकारी, सार्वजनिक माहिती अधिकारी, सार्वजनिक तक्रार अधिकारी म्हणून काम केले.
प्रकाश नाईक यांनी तरुण पिढीला यश आणि विकासाशी संबंधित कथा लिहिण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. त्यामुळे खात्याचे नाव व प्रतिमाही उंचावेल, असे त्यांनी सांगितले.
निरोप समारंभास माहिती खात्याचे संयुक्त संचालक गणराज मोरजकर, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. साहाय्यक माहिती अधिकारी श्याम गावकर यांनी सूत्रसंचालन केले.