गोवा खबर : इंडिया ॲक्सेसिबिलिटी समिट आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त परिषद २०२४ निमित्त भारताचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-२०२४ विषयीच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशकता आणि प्रवेशसुलभतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड म्हणून बेंगळुरू शहरात आयोजित हा उपक्रम ठरला.
या प्रकाशन समारंभास भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यासह सर्वाच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न, केंद्रीय दिव्यांगजन आयुक्तालयाचे मुख्य आयुक्त तसेच केंद्र शासनाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अगरवाल (आयएएस), कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही. अंजारिया, पद्मश्री पुरस्कारप्राप्त तसेच पर्पल अम्बेसिडर व्यंकटेश येथिराज आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त (गोवा) गुरुप्रसाद पावसकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
परिषदेदरम्यान चंद्रचूड यांनी भारतीय समाजातील सर्वसमावेशकता आणि प्रवेशसुलभता या बाबींची आवश्यकता अधोरेखित करणारे प्रेरणादायी भाषण केले. ते म्हणाले, भविष्यात भारत देशामध्ये दिव्यांग व्यक्तींना सर्वसमावेशी समाजात सहजपणे वावरता येईल अशी वातावरण निर्मिती होणे मला अपेक्षित आहे. दिव्यांगजनांना समाजाच्या सर्वच क्षेत्रात सुलभ सहभागी होता यावे यासाठीच्या आवश्यक उपाययोजनांसाठी दिव्यांगजनांसमवेत नियमित संवाद होत राहणे आवश्यक ठरणार आहे.
राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. ते म्हणाले, दिव्यांग व्यक्तींमधील जिद्द, निर्धार आणि त्यांची यशोगाथा साजरी करण्यासाठी एक आशेचा किरण आणि प्रभावी व्यासपीठ म्हणून आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट हा उपक्रम काम करत आहे. कोणत्याही क्षमताच्या पलीकडे जात प्रत्येक व्यक्तीला संधी आणि संसाधनांचा लाभ घेण्यासाठी समान न्याय मिळावा ही आमची वचनबद्धता आहे. कॉफी टेबल बुक हे केवळ अनुभवांचे संचित एवढ्यापुरतेच मर्यादित नसून, सर्वसमावेशक आणि प्रवेशसुलभ समाजाच्या दिशेने आपल्या सामूहिक प्रवासाचे प्रतिबिंब आहे. सर्व व्यक्तींच्या हक्कांचे आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करत राहण्याच्या विचारांचा आपण पुरस्कार करत राहणे आणि त्यासाठी पूरक धोरण राबवणे आवश्यक आहे.