गोवा खबर

ओएसडीच्या बर्लिन खर्चाच्या आरोपांचा पुरावा द्या

Published

on

Spread the love
  • अन्यथा आरोप मागे घ्या : खंवटे यांचे फेरेरांना आव्हान
गोवा खबर : माझ्या ओएसडीच्या बर्लिन दौर्यावरील १ कोटी रूपयांच्या खर्चाचा पुरावा सादर करा अन्यथा आपला आरोप त्वरित मागे घ्या, असे खुले आव्हान पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज राज्य विधानसभेत हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांना दिले. सभागृहात अचकीत मिळालेल्या आव्हानामुळे फेरेरा यांची पुरती धांदळ उडाली व त्यांनी एकंदर बर्लिन खर्च मला म्हणायचे होते, अशी सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.   
हळदोणे मतदारसंघाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी पर्यटनमंत्र्यांच्या ओएसडीने बर्लिनच्या विदेश दौर्यावर १ कोटी ४ लाख रूपयांचा खर्च केल्याचा आरोप काल पर्यटन खात्याच्या आर्थिक मागण्यांवरील चर्चेवेळी विधानसभेत केला होता. हा दावा चुकीचा असून ओएसडीवर केवळ ६ लाख ५० हजार ५७ रूपये एवढा खर्च केल्याची अधिकृत आकडेवारी पर्यटनमंत्री खंवटे यांनी आज सभागृहात दिली.
तद्नंतर पर्वरी विधानसभा संकुलातील त्यांच्या चेंबरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत खंवटे यांनी सांगितले की, ओएसडी म्हणजे कारकूनसारखे पद असा सर्वसाधारण समज झाला आहे. पर्यटन व आयटी खात्यातील माझे दोन्ही ओएसडी हे त्या त्या विभागात स्पेशलायझेशन प्राप्त केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी मी दौरा करू शकत नाही. माझ्यातर्फे त्यांना पाठविताना त्याची जबाबदारी माझी असते असे खंवटे म्हणाले.
जंकेट टूर्स त्यांना म्हणता येईल, जिथे खात्याचे चार चार लोक दौर्यावर जातात. तिथे माझ्यातर्फे अनेक कामे करायची असतात, ती जबाबदारी देऊन त्यांना पाठविलेले असते. शिवाय वेगवेगळ्या पर्यटन क्षेत्रातील दावेधारकांशी बैठका लावणे, एमओयू करणे, नव्या अरेंजमेंटस्, एअरलाईन्स कंपन्यांना भेटणे या गोष्टीही महत्वाच्या ठरतात. गेल्या दोन वर्षात मी दोन ते तीन ठिकाणीच दौरा केला आहे, व हा दौरा जिथे खरोखरीच मंत्री म्हणून माझी गरज आहे, अशा ठिकाणीच मी गेलो आहे, अशी स्पष्टोक्ती खंवटे यांनी दिली.
तथापि, सगळ्याच ठिकाणी मी पोचू शकत नाही, तिथे माझ्यावतीने ओएसडीना पाठविलेले असते. पर्यटनाचा विस्तार व विकास करताना इमर्जिंग मार्केटसमध्ये उतरणे गरजेचे असते. त्यासाठी नवे विचार, संकल्पनाही पुढे येणे आवश्यक आहे. नव्या दमाच्या व्यक्ती म्हणूनच जबाबदारी देऊन पाठविल्या जातात, असे खंवटे यांनी सांगितले. त्यामुळे अशा गोष्टींना हरकत असण्याचे कारण नाही. सगळ्याच ठिकाणीचे दौरे मंत्री म्हणून मी एकटाच करू शकत नाही असेही खंवटे यांनी सांगितले.
ओएसडी मेंडीस यांनी आपले मास्टर्स केले असून पर्यटन क्षेत्रातील त्यांना १६ वर्षांचा दांडगा दीर्घानुभव असल्याचे पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले.  आयटीबी बर्लीन दौर्याचा पूर्ण अहवाल माझ्याकडे आहे. बर्लिनच्या पूर्ण इव्हेंटवर १ कोटी ४ लाख खर्च झाला असून साडे सहा लाख रूपये एवढाच ओएसडीवर खर्च आहे. जंकेट टूर्स मी बंद केल्यामुळे नियमित जाणार्या खात्याच्या काही कर्मचार्यांना पोटशूळ उठला की काय असे मला वाटले, अशी खोचक टिपणीही खंवटे यांनी केली.

Trending

Exit mobile version