गोवा खबर

जगाला गोव्याची नवी ओळख घड़वू: खंवटे

Published

on

Spread the love
पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, नव्या हंगामाआधी शॅक परवाने
गोवा खबर: पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत किनार्यावरील जीवरक्षक कंपनीच्या नव्या कंत्राटाची प्रक्रिया पुढील ३ महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन पर्यटनमंत्री रोहन अ. खंवटे यांनी आज गोवा विधानसभेत दिले. तसेच शॅक परवान्यांची नूतनीकरण प्रक्रिया ३० सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून नव्या पर्यटन हंगामाआधी शॅक्स कार्यान्वित करण्याची घोषणाही त्यांनी केली व पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी विधायक दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन विरोधकांना केले. 
पर्यटन खात्याच्या सभागृहात मांडलेल्या आर्थिक अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना खंवटे बोलत होते. गोवा पर्यटन क्षेत्रात पुढे नेण्यासाठी सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी मांडलेल्या विधायक सूचनांसाठी त्यांनी आभार व्यक्त केले. लाईफ गार्ड संबंधी आधीच्या कंपनीचा करार संपल्याने नव्या कंपनीची निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून ती ३ महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर नवी कंपनी निवडली जाईल असे खंवटे यांनी सांगितले. किनारी जीवरक्षकांनी  १ हजार २३७ लोकांचे प्राण वाचविले असून २६६ जणांना मृत्यू आला आहे. त्यात किनार्यावर वाहून आलेल्या शवांचाही समावेश असल्याचे खंवटे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी ज्या शॅक मालकांना ना हरकत दाखला देण्यात आला आहे त्यांनी ऑनलाईन अप्लाय केल्यास त्यांना शॅक परवाना दिला जाईल. ही प्रक्रिया ३० सप्टेंबर पर्यत पूर्ण केली जाणार असून ज्यांना गेल्या वर्षी ना हरकत दाखला नाही त्यांचा वेगळा विचार केला जाईल असे खंवटे यांनी सांगतिले.
जलक्रिडा, सांस्कृतिक व उत्सवी परंपरेला प्रोत्साहन देत राज्याचे पर्यटन पुढे नेण्याची आवश्यकता असून पर्यटन उद्योगात बेकायदेशीर गोष्टी मात्र कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशी तंबी पर्यटनमंत्र्यांनी दिली. होम स्टेला प्रोत्साहन देणे आवश्यक असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा सात तालुक्यासाठी हे धोरण असल्याचे खंवटे यानी स्पष्ट केले. या भागातील महिलांना सक्षम करण्याचा उद्देश ठेऊन ते आखण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
यावर्षी गोव्यात ४ लाख ५२ हजार विदेशी तर ८० लाखाहून अधिक देशी पर्यटकांनी राज्यात आगमन केल्याची माहिती खंवटे यांनी दिली. जी २० परिषदेमुळे ६७ विदेशी पर्यटन मंत्री राज्यात दाखल झाले. या परिषदेतून पुनर्उत्पादीत पर्यटनाची संकल्पना पुढे आली व ती राबविणारे गोवा हे पहिले राज्य ठरल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. ही संकल्पना पर्यावरण, अर्थव्यवस्था व समाज या तीन स्तंभावर आधारित असल्याचे ते म्हणाले.
पर्यटन उद्योग दरडोई उत्पन्नात ३३.४२ टक्के योगदान देत असून तो राज्याच्या सामाजिक व आर्थिक विभागाचा महत्वाचा घटक असल्याचे पर्यटनमंत्री खंवटे यांनी सांगितले. तेलंगणा, उत्तराखंड, झारखंड, उडिशा, कर्नाटक ही राज्येदेखील पर्यटनाच्या विकासासाठी कार्यरत झाली आहेत. अशावेळी गोवा मागे राहू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले. विदेशात गोव्याची नवी ओळख घडविण्यासाठी म्हणजेच समुद्रा पल्याडचा गोवा काय आहे ते सांगण्यासाठी व त्याच्या प्रसारासाठी रोड शो व ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभाग आवश्यक ठरतो असे त्यांनी स्पष्ट केले.
गोवा पर्यटक, प्रोत्साहन, व्यवस्थापन आणि नियंत्रण विधेयक २०२४ अर्धवट माहितीच्या आधारे विरोध करू नका असे आवाहन त्यांनी केले. या विधेयकाच्या मसुद्याची पूर्ण माहिती घ्या कारण ते पर्यटन उद्योगाच्या हितासाठी असल्याचे खंवटे यांनी सांगितले. २ टक्क्यांपर्यंतचे शुल्क हे सरसकट कोणालाही लावले जाणार नाही. त्यासाठी खास विभाग नियुक्त केले जातील व त्यापुरतेच ते मर्यादीत असेल असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
सत्ताधारी गटातर्फे आमदार जेनिफर मोन्सेरात, प्रेमेंद्र शेट, आलेक्स रेजिनाल्ड, मायकल लोबो, गणेश गांवकर, कृष्णा साळकर, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, जीत आरोलकर, दिगंबर कामत, निलेश काब्राल, जोशुआ डिसोझा  यांनी पर्यटन खात्याच्या विकासासाठी चर्चेत सहभागी होत अनेक महत्वाच्या सूचना सरकारला केल्या.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्यासह आमदार कॅ. व्हॅन्झी व्हिएगस, कार्लुस फेरेरा, विरेश बोरकर, एल्टन डिकॉस्ता, क्रुझ सिल्वा, विजय सरदेसाई, यांनीही वरील खात्यांच्या आर्थिक मागण्यावरील चर्चेत सहभाग घेतला.
पर्यटन विकासासाठी सूचना
किनारी भागात पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यापासून ते समुद्र किनारी बुडून मृत्यू येण्याच्या घटना, पर्यटन विस्तारासाठी आयोजित केले जाणारे रोड शो व ट्रॅव्हल मार्ट विषयी विरोधकांनी अनेक महत्वाच्या सूचना व शिफारशी यावेळी सरकारला केल्या. ट्रॅव्हल मार्ट संकल्पना ही पर्यटन विस्तार व विकासासाठी काळाची गरज असल्याचे व्हिएगस म्हणाले.
 आध्यात्मिक पर्यटनाच्या वृध्दीसाठी ऐतिहासिक महत्व लाभलेली मंदिरे व वारसा स्थळांचा पर्यटन दृष्टीकोनातून विचार व्हावा अशी सूचना यावेळी झाली. पावसाळी/ आंतरग्राम पर्यटनाचा विकास व्हावा
दोनापावला जेटीवर जाण्यासाठी ईव्ही वाहने उपलब्ध करण्यासह गोव्यातील किनार्यांची स्वच्छता राखणे व पर्यटकांची सुरक्षा सांभाळणे, किनारी भागात बुडून मृत्यू येणार्या घटना रोखण्यासाठी उपाय योजना करणे, राज्यात दर्जेदार पर्यटक यावेत यासाठी प्रयत्न करणे अशा विविध सूचनांचा त्यात समावेश होता. पावसाळी पर्यटनासह आंतरग्राम पर्यटनाला गोव्यात वाव असून त्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली.
क्रुझ, वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे
क्रुझ व वैद्यकीय पर्यटनासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. गोव्याच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन मंत्र्यांचे विदेश दौरे आवश्यक असतात असे मतही सभागृहात व्यक्त झाले. हिंटरलँड पर्यटन प्रोत्साहनाचा सरकारने विचार करावा अशी सूचनाही आमदारांनी केली. होम स्टे बाबत सुधारणा आवश्यक असल्याची सूचनाही सदस्यांनी केली. जीवरक्षकांसाठी प्रशिक्षण व संख्याबळ वाढविणे आवश्यक असल्याचे आमदारांचे म्हणणे होते. जीवरक्षक चांगले काम करत असून त्यात सुसूत्रता आणण्यासाठी संस्था व किनारी भागातील आमदारांची बैठक घेण्याची सूचना सदस्यांनी मांडली.
शिवजयंती उत्सवानिमित्त अभिनंदन
भाडे तत्वावरील पर्यटन खात्याच्या जागा ज्या वापराविना राहिल्या आहेत त्या वापरात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही सदस्यांनी मांडली. त्यामुळे खात्याच्या महसुलात वाढ होईल अशी सूचना त्यांनी केली. शिवजयंती उत्सव राज्य पातळीवर साजरा करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे चर्चेवेळी कौतुक झाले. पर्यटन खात्याला बर्लिन आयटीबीमध्ये मिळालेल्या सर्वोत्कृष्ठ पर्यटन स्थळ, व सर्वोत्कृष्ठ पर्यटन मंत्री हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पर्यटन मंत्री खंवटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सभागृहात झाला.
सरदेसाईंकडून खंवटेंचे अभिनंदन
खात्याच्या पुनर्उत्पादीन पर्यटन उपक्रमासह स्वदेश दर्शन योजनेखाली कोलवा किनार्याचा विकास, बाझिलिका बॉम जिझस चर्चचा प्रासाद खाली करण्यात येत असलेला विकास, पारंपरिक चिखलकाला, सां जुआंवच्या वृध्दीसाठी केलेल्या प्रयत्नांचे आमदार विजय सरदेसाई यांनी कौतुक केले.
जीवरक्षकांचे काम कौतुकास्पद
फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्यासह कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी किनार्यावरील जीवरक्षक चांगले काम करत असल्याचे सांगितले. खंवटे हे पर्यटनमंत्री म्हणून बरेच सक्रिय असून त्यांच्याकडून बर्याच अपेक्षा असल्याचे सरदेसाई म्हणाले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांची अर्धवट माहिती आज पर्यटनमंत्री खंवटे यांनी उघडी पाडली. पर्यटन खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेवेळी आलेमांव यांनी फोर्ट आग्वाद येथे जाण्यासाठी काही स्वातंत्र्य सैनिकांना मज्जाव केल्याचे वृत्त प्रसारित केल्या प्रकरणी एका वृत्त वाहिनीला नोटीस बजावल्याचा आरोप केला होता.
या आरोपावर हरकतीचा मुद्दा उपस्थित करत खंवटे यांनी अशी कोणतीही नोटीस पाठविण्यात आली नसल्याचे सभागृहात स्पष्ट केले. एखाद्या खाजगी कंपनीने पाठविली असल्यास त्याचे खापर पर्यटन खात्यावर फोडता येणार नाही असेही खंवटे यांनी बजावले. वैध ओळखपत्र दाखविल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांना प्रवेश दिल्याचेही खंवटे यांनी सांगितले.

Trending

Exit mobile version