गोवा खबर: छपाई व मुद्रण खात्याच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न सूरू असून योग्य जागा उपलब्ध होताच प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी घोषणा छपाई व मुद्रण मंत्री रोहन अ. खंवटे यांनी आज गोवा विधानसभेत केली.
छपाई व मुद्रण खात्याच्या सभागृहातील आर्थिक अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना खंवटे बोलत होते. २०२४-२५ वर्षासाठी सुमारे १८ रूपयांच्या अर्थ संकल्पीय तजवीजीवर खाते काम करत आहे. खात्याच्या कामासाठी मर्यादा आहेत. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पीय भाषणे, रोजगार वार्ता प्रसिध्द करण्यासारख्या काही नव्या गोष्टी सुरू केल्याची माहिती खंवटे यांनी दिली.
खात्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले. इ गॅझेट सुरू करण्यात आले असून ऑनलाईन सबक्रीप्शनही चालू करण्यात आले. सध्याची जागा अपुरी पडत असून आधुनिकीकरणासाठी नवी जागा शोधत आहोत. आयडीसीकडून जागा उपलब्ध होताच पोर्तुगीजकालीन सामुग्रीचे वस्तूसंग्रहालयही करू असे ते म्हणाले.
कोकणी अनुवादकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडून राजपत्र कोकणीत अनुवादीत करण्याचे प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सत्ताधारी गटातर्फे आमदार जेनिफर मोन्सेरात, प्रेमेंद्र शेट, आलेक्स रेजिनाल्ड, मायकल लोबो, गणेश गांवकर, कृष्णा साळकर, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, जीत आरोलकर, दिगंबर कामत, निलेश काब्राल, जोशुआ डिसोझा यांनी छपाई तसेच मुद्रण खात्याच्या सुधारणेसाठी चर्चेत सहभागी होत अनेक महत्वाच्या सूचना सरकारसमोर ठेवल्या.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्यासह आमदार कॅ. व्हॅन्झी व्हिएगस, कार्लुस फेरेरा, विरेश बोरकर, एल्टन डिकॉस्ता, क्रुझ सिल्वा, विजय सरदेसाई, यांनीही छपाई व मुद्रण खात्याच्या आर्थिक मागण्यावरील चर्चेत सहभाग घेतला.
राजपत्राची किंमतपासून ते सहजपणे कसे उपलब्ध व्हावे याविषयी विरोधकांनी अनेक महत्वाच्या सूचना व शिफारशी यावेळी सरकारला केल्या. खात्याच्या दिनदर्शिका व डायरीज वेळेवर येणे आवश्यक असल्याचे आमदारांनी सांगितले. ड्रॉन तंत्रज्ञान ही आजच्या युगाची गरज असून ड्न अकादमी स्थापन करण्याचा विचार व्हावा अशी मागणीही सदस्यांनी केली.