गोवा खबर : सहा दिवसीय इंडोनेशिया आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ( एनएफडीसी ) चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ 7 जुलै रोजी मुंबईतील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएमआयसी) येथे झाला.
या महोत्सवाची सुरुवात 1 जुलै रोजी झाली होती आणि आठवडाभर चाललेल्या उत्सवाचा समारोप ‘आरआरआर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने झाला. 6 जुलै सुरू झालेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात तीन दिवस इंडोनेशियन चित्रपट आणि तीन दिवस भारतीय चित्रपट दाखवण्यात आले.
समारोप समारंभात इंडोनेशियन कलाकारांनी केलेल्या आकर्षक केकाक नृत्य सादरीकरणाने सांस्कृतिक देवाणघेवाणीचे सौंदर्य अधिकच वाढवले. भारतीय संस्कृतीत मूळ असलेले केकक नृत्य हे इंडोनेशिया आणि भारत यांच्यातील चित्रपटाच्या माध्यमाने वाढलेल्या संबंधांचे प्रतीक आहे.
इंडोनेशियाचे कॉन्सुलेट जनरल, एडी वार्डोयो यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी समारोपाबद्दल आनंद व्यक्त केला आणि जागतिक स्तरावर प्रेक्षकांचे सिनेमाशी संबंध वाढविण्यातील याची भूमिका अधोरेखित केली. त्याचबरोबर मंत्री सल्लागार एको जुनोर यांनी सर्व सहभागींचे आभार मानले आणि परस्पर सामंजस्य आणि प्रोत्साहन वाढवण्याच्या या महोत्सवाच्या भूमिकेवर भर दिला.
एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांनी चित्रपट निर्मिती आणि सांस्कृतिक विविधतेच्या या सहयोगी उत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या ऐतिहासिक महत्त्वाला अधोरेखित केले. शिवाय एनएमआयसी-एनएफडीसी व्यवस्थापक जयिता घोष यांनी मान्यवरांना बांबूचे रोपटे भेट म्हणून दिले, ज्यातून उत्सवाची शाश्वतता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या दीर्घकाळ टिकण्याच्या संकल्पनेला चालना मिळाली.
इंडोनेशिया आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) चित्रपट महोत्सव 2024 ने केवळ विविध प्रकारच्या अनमोल सिनेमांचे प्रदर्शनच केले नाही तर सांस्कृतिक सीमांना सामावून घेण्यासाठी चित्रपटाच्या सामर्थ्याला सर्वांसमोर आणण्याचे कार्य केले. समारोपानंतर, सहभागींनी आणि आयोजकांनी भविष्यकाळातील सहयोग आणि सिनेमा द्वारे सुरू राहणाऱ्या सांस्कृतिक समृद्धीबद्दल आशावाद व्यक्त केला. समारोप समारंभात चित्रपट निर्माते आणि उद्योगातील व्यावसायिकांसह एक प्रश्नोत्तर सत्र देखील झाले, ज्यातून चित्रपट निर्मिती कला आणि आंतरसांस्कृतिक सहकार्यावर विचारमंथन करण्यात आले.