गोवा खबर : गोवा वैद्यकिय महाविद्यालयाच्या आवारात नुकतेच भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) यांच्यातर्फे पुरस्कृत कॅन्सर डिटेक्शन व्हॅनचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, गोवा वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आदी उपस्थित होते.
अत्याधुनिक मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅनचे उद्घाटन करणे ही अभिमानस्पद गोष्ट आहे. आरोग्य क्षेत्रातील प्रगती यावरुन दिसून येते. ‘भेल’च्या सामाजिक जबाबदारी उपक्रमाअंतर्गत प्रदान केलेली आणि सीडीएसी केरळद्वारे निर्मित ही व्हॅन कर्करोगाविरुद्धच्या आमच्या लढ्यातील मोठे पाऊल दर्शवते. त्यांच्या अमूल्य पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार, असे केंद्रीय मंत्री नाईक यांनी सांगितले.
अॅनालिझर, डिजिटल मॅमोग्राफी मशिन, अल्ट्रासाऊंड मशिन आणि कोल्पोस्कोपी आणि क्रायोसर्जरी यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ही व्हेन सुसज्ज आहे. या व्हॅनमुळे अनेक गोष्टी सोप्या होईल. रुग्णांमधील कर्करोग प्राथमिक स्तरावरच ओळखण्यास यातील सुविधा उपयोगी पडणार आहे.डॉक्टर्सचे कामही सोपे होईल. त्यामुळे एकंदरीत आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रभाव पडणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
सीडीएसी केरळचे तज्ज्ञ पुढीलकाही दिवसात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ही यंत्रणा वापरण्याबाबत प्रशिक्षण देणार आहेत. या संदर्भात पहिले शिबिर
२३ रोजी आरएचटीसी मंडूर येथे होईल, त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी आणखी शिबिरांचे आयोजन होईल. राज्यात वाढत असलेल्या कर्करोगाशी लढा देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. त्यासाठी राज्यासाठी परिवर्तनशील उपक्रम आम्ही सुरूच ठेवू, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.