गोवा खबर : राज्यात वाढत्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षात घेत आरोग्य खाते सतर्क झाले आहे. नुकत्याच आलेल्या अहवालात राज्यात ६० डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, उत्तर गोव्यात जास्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आरोग्य खात्याप्रमाणे लोकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, लोकांनी डेंग्यूपासून सुरक्षित राहण्यासाठी सक्रिय उपाययोजना कराव्यात. ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांना वेदना, सांधे आणि स्नायू दुखणे, पुरळ, मळमळ आणि उलट्या यासारख्या लक्षणांकडे लक्ष द्यावे.
राणे म्हणाले, डास प्रतिबंधक वापरा, लांब बाह्यांचे कपडे घाला आणि परिसर स्वच्छ ठेवा, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, तत्काळ मदतीसाठी तुमच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या.
मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या, आम्ही राज्यभरात जनजागृती करीत आहोत. लोकांनी आपल्या परिसरात पाणी साचू देऊ नये. लोकांनी स्वच्छता बाळगावी. बहुतांश तक्रारी या शहरी भागातील आहेत. यातील जास्त तक्रारी या उत्तर गोव्यातील आहेत. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पडलेल्या पावसामुळे साथीचे आजार फैलावले आहेत. त्यात आता पूर आल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनणार आहे. त्यांनी लोकांनी सावधगिरी बाळगावी.