गोवा खबर: पर्ये मतदारसंघातील होंडा- पोस्तवाडा भागात राहणाऱ्या महेश गावस यांच्या घराचे रविवारी वादळी पावसात छप्पर उडून गेले होते. या घटनेची तत्काळ दखल घेत स्थानिक आमदार डॉ. देविया राणे यांनी दोन दिवसांत छप्पर उभे करून त्या कुटुंबाला दिलासा दिला आहे.
रविवारी 7 जुलै रोजी दुपारच्या वेळी होंडा भागात जोरदार वादळी पावसाच्या तडाख्याने पोस्तवाडा भागात राहणाऱ्या गावस कुटुंबाच्या घराचे छप्पर उडून गेल्याने भर पावसात त्यांचा संसार उघड्यावर पडला होता. भरपावसात बेघर होण्याची वेळ आली. या घटनेची माहिती स्थानिक सरपंच शिवदास माडकर यांनी पर्येच्या आमदार डॉ. राणे यांना दिली. त्यांनी तत्काळ दखल घेत त्या घरांवर तातडीने छप्पर घालून देण्याची प्रक्रिया सुरू केली.
सोमवारी सकाळपासून कामगारांना पाठवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या घरांवर लोखंडी कमान बसून सिमेंटचे पत्रे घालण्यात आले आहेत.
याबाबत घरमालक महेश गावस म्हणाले, आमदार राणे या देवाप्रमाणे धावून आल्या आणि आमचे घर उभं करण्यास मदत केली आहे.त्याच प्रमाणे सरपंच शिवदास माडकर यांनी ही समस्या आमदार राणे यांच्या पर्यंत पोहोचली. त्यामुळे त्या दोघांचे ऋणी आहोत.
दरम्यान, वेळूस-सत्तरी येथे सत्यवती च्यारी या वृद्ध महिलेला आधार देताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांनी जुन्या घराच्या जागी नवीन घर बांधून सदर घराच्या दुरुस्तीवर अंदाजे दीड ते दोन लाख रुपये खर्च केले असून त्याचे काम सुरु झाले आहे.