गोवा खबर

गोवा पर्यटन व्यवस्थापन विधेयकाच्या मसुद्यावर सार्वजनिक अभिप्रायासाठी मुदतवाढ 

Published

on

Spread the love

गोवा खबर :  गोवा पर्यटन प्रचार आणि व्यवस्थापन विधेयक, 2024 चा मसुदा लोकांच्या हरकती आणि सूचनांसाठी खुला आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी 6 जुलै ही अंतिम मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली असल्याचे आज जाहीर केले.

खंवटे म्हणाले, राज्यातील पर्यटनाला नवा आकार देणे आणि बेकायदेशीर कामांवर कारवाई करणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीही हे विधेयक फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री रोहन खंवटे

या विधेयकामुळे राज्यातील पर्यटन उद्योगाला बळ मिळेल, यावर त्यांनी भर दिला. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन हे विधेयक मांडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या 10 दिवसांत या विधेयकाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मंत्री, आमदार आणि उद्योग क्षेत्रातील सर्व भागधारकांना सादरीकरण केले जाईल. स्पर्धात्मक पर्यटन युगात, गोवावासीयांसाठी त्यांचे व्यवसाय टिकवणे आवश्यक आहे. त्यासाठी हे विधेयक फायदेशीर ठरणार आहे. पर्यटन क्लस्टर्सच्या विकासासाठी 27 वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या असून त्यानुसार महसुलाचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या दीड वर्षात संबंधित यंत्रणेने केलेल्या अभ्यासातून हे विधेयक तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मागील 40-45 वर्षांत पर्यटनाचा कायापालट झाला आहे. अशा वेळी जुन्या कायद्यांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. हे विधेयक ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (TTAG), भागधारक, पोलिस, इतर विभाग आणि तज्ज्ञ मंडळी आदींसोबत 33 पेक्षा जास्त बैठका घेऊन सल्लामसलत केल्यानंतर तयार करण्यात आले आहे. विधेयकाचा मसुदा सूचनांसाठी खुला असल्याने सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. लोकांकडून अधिक सूचना आणि मतांसाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

2% शाश्वतता शुल्क आकारले जाईल हा दावा निराधार आहे; हा 2% पर्यंतचा कर आहे आणि एकदा ते तयार केल्यावर तो फक्त संबंधित क्लस्टरपुरता मर्यादित असेल. त्यामुळे त्याबाबत मुद्दा बनवणे अनावश्यक असल्याचा आरोप खंवटे यांनी केला. या विधेयकामुळे विभागातील महसूल गळती रोखण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

गोवा आणि गोवावासीयांच्या हितासाठी सरकार काम करत असून, सर्वांनी रचनात्मक कार्य करणे अधिक योग्य ठरेल, असे आवाहनही खंवटे यांनी केले.

Trending

Exit mobile version