गोवा खबर

नावीन्यपूर्ण सायबरसुरक्षा कार्यशाळेच्या माध्यमातून गोव्यातील दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न

Published

on

Spread the love

गोवा खबर : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाने राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने ६ रोजी सायबरसुरक्षा जागरूकता कार्यशाळेचे आयोजन केले होते. मुंबई उच्च न्यायालय-गोवा खंडपीठ संकुलातील गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीतील लोक अदालत सभागृहामध्ये ही कार्यशाळा पार पडली.

खास दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित या अर्धदिवसीय कार्यशाळेमध्ये एडव्होकेट ईशान उसपकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस गोव्यातील विविध शासकीय खाती, विभागांच्या कार्यालयांमधील कार्यरत ५५हून अधिक दिव्यांग शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. मुंबई उच्च न्यायालय-गोवा खंडपीठाचे वरिष्ठ अधिकारी आणि न्यायाधीश यांनीही कार्यशाळेत सहभागी होत या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.

अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमितपणे आयोजित करण्याची गरज अधोरेखित करताना राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, आर्थिक फसवणूक होण्याचा आणि सायबर गुन्ह्यांचा धोका असतो अशा लोकांसाठी, विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी सायबरसुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सायबरसुरक्षेच्या अत्यावश्यक बाबींचा प्रचार करून, डिजिटल जगामध्ये सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक आणि आर्थिक कल्याणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाला सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे.

सहभागींसाठी सदरचे सत्र माहितीपूर्ण ठरतानाच सायबरविश्वास सुरक्षा साधण्याबाबत सक्षम करणारे ठरले. ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे या बाबी दिव्यांग व्यक्तींवर गंभीरपणे प्रभाव टाकत असतात. त्यामुळे अशा प्रकारांतून फसवणूक टाळण्यासाठी अत्यावश्यक अशा सायबरसुरक्षेबाबतच्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. गोव्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. सायबर सुरक्षेबाबतच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याच्या कृतिशील दृष्टिकोनाबद्दल या कार्यशाळेचे स्वागत व कौतुक करण्यात आले.

विविध जागरूकता उपक्रमांद्वारे दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करण्याच्या प्रयत्नांमध्ये राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण आघाडीवर आहेत. सर्वांसाठी अधिक सुरक्षित आणि अधिक सर्वसमावेशक असे वातावरण उपलब्ध करण्याचा ध्यास बाळगून राबवण्यात येत असलेल्या  प्रयत्नांचे प्रतिबिंब या नावीन्यपूर्ण कार्यशाळेतूनही उमटले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनामध्ये गोवा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव विजया आम्ब्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Trending

Exit mobile version