गोवा खबर:गोवा राज्य अवयव आणि टीश्यू प्रत्यारोपण संस्थाद्वारे आयोजित केलेल्या माहिती मोहिमेच्या मालिकेचा एक भाग म्हणून माहिती आणि प्रसिध्दी कार्यालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांसाठी अवयव आणि टिश्यू प्रत्यारोपणाबद्दल जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते.
गोवा राज्य अवयव आणि टीश्यू प्रत्यारोपण संस्थेच्या संयुक्त संचालक डॉ. प्रीती वर्गीस आणि सल्लागार, आयईसी (मीडिया आणि प्रकाशन), श्रीमती श्रद्धा केरकर यांनी मृत दात्या प्रत्यारोपण कार्यक्रम, “नवे जीवीत” “नवे जीवन” याविषयी सविस्तर माहिती दिली आणि हृदय, फुफ्फुसे, किडनी, यकृत निकामी होणे या व्यतिरिक्त कॉर्नियल अंधत्व, व्हॉल्व्ह्युलर हृदयरोग, गंभीर भाजणे आणि हातांचे आघातजन्य विच्छेदन यासारख्या आजारग्रस्तांचा अमूल्य जीव वाचविण्यासाठी अवयव दाता बनण्याचे आवाहन केले.
श्रीमती श्रद्धा केरकर म्हणाल्या, अवयवदान किंवा टिश्यू दान हे एक उदात्त कार्य आहे, जे मृत्यूनंतर जीवन वाचविण्याची संधी देते. जिवंत अवयव दान आणि मृत अवयव दान हे दोन प्रकारचे अवयवदान असल्याचे त्या म्हणाल्या. जिवंत अवयव दान करताना १८ वर्षांवरील व्यक्ती, देशाच्या कायदेशीर चौकटीत उपचारात्मक हेतूंसाठी अवयव काढून टाकण्यास स्वेच्छेने दान करू शकते. मृत अवयवदान करताना एखादी व्यक्ती वयाची पर्वा न करता अनेक अवयव किंवा टिश्यूचे दान करू शकते आणि ब्रेन-स्टेम किंवा हृदयविकाराच्या मृत्यूनंतर अनेक रुग्णांना जीवन देऊ शकते असे श्रीमती केरकर म्हणाल्या.
श्रीमती केरकर यांनी गोवा सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ऑक्टोबर २०१९ मध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालयात राज्य अवयव आणि टीश्यू प्रत्यारोपण संस्था स्थापन करण्यात आली असे सांगितले. सध्या, गोव्याच्या ‘नवे जीवित’ मृत दात्याच्या किडनी प्रत्यारोपण कार्यक्रमात प्रतीक्षा यादीत ६३ रुग्णांची नोंद आहे. आत्तापर्यंत गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ५ मृत दात्याचे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले असून १८ अवयव दान करण्यात आले आहेत त्यात १० मूत्रपिंड, ४ यकृत, ३ हृदय आणि १ फुफ्फुस दान करण्यात आले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आजपर्यंत एकूण ३० किडनी प्रत्यारोपण मोफत करण्यात आले आहेत.
कायदेशीर चौकटीबाबत डॉ. प्रीती वर्गीस यांनी मानवी अवयवांचे प्रत्यारोपण कायदा १९९४ उपचारात्मक हेतूने अवयव काढून टाकणे, साठविणे आणि प्रत्यारोपण करण्याचे नियमन करतो आणि मानवी अवयवांचे व्यावसायिक व्यवहार रोखतो. गोवा राज्याने २०११ THOTA आणि THOA नियम २०१४ मध्ये सुधारणा स्वीकारली आहे असे सांगितले. डॉ वर्गीस यांनी आजपर्यंत गोवा राज्य अवयव आणि टीश्यू प्रत्यारोपण संस्थेने शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक गट यासारख्या लक्ष्यित गटांवर जोर देऊन सात सरकारी खात्यांसाठी जागरुकता सत्रे आयोजित केली आहेत अशी माहिती दिली.
जागरूकता सत्रात सहभागी झालेल्या माहिती खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सल्लागार श्रीमती केरकर आणि डॉ वर्गीस यांच्याशी अवयवदानाशी संबंधित विविध पैलूंवर संवाद साधला.
सुरवातीस माहिती अधिकारी श्री प्रकाश नाईक यांनी संसाधन व्यक्तींचे स्वागत केले आणि अवयव दान करून इतरांचे जीवन वाचविण्याच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांना अवयवदानाबद्दल मौल्यवान माहिती प्रदान केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.