गोवा खबर: माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक आणि सदर खात्याचे समाजमाध्यम खाते हाताळणाऱ्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की ते भाजप नव्हे तर गोवा राज्यासाठी काम करत आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच इतर विरोधी पक्षाचे आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची नावे आणि फोटो का टाळले? असा सवाल काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष दिव्या कुमार यांनी केला आहे.
नवीन सहाय्यक बिशप रेव्ह. सिमाओ फर्नांडिस यांच्या एपिस्कोपल ऑर्डिनेशनच्या सोहळ्यावेळी उपस्थित फक्त सत्ताधारी मंत्री व आमदारांचे फोटो माहिती आणि प्रसिद्धी खात्याने आपल्या समाजमाध्यमांवरुन प्रसारीत केल्याने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेसच्या समाजमाध्यम विभाग अध्यक्षांनी सदर सोहळ्यासाठी विरोधी आमदारांच्या उपस्थितीचा उल्लेख न केल्याबद्दल माहिती आणि प्रसिद्धी खात्यावर जोरदार टीका केली.
यापूर्वीही माहिती व प्रसिद्धी खाते भाजपचेच काम करत असल्यासारखे वागत आले आहे. माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक आणि इतर कर्मचारी करदात्यांच्या पैशातून पगार घेतात आणि विरोधी आमदारांना सुद्धा प्रसिद्धी देणे हे खात्याचे कर्तव्य आहे असे दिव्या कुमार म्हणाले.
आम्ही खात्याच्या भविष्यातील पोस्टवर लक्ष ठेवू. पक्षपाती वृत्ती कायम राहिल्याचे आढळून आल्यास आम्ही माहिती आणि प्रसिद्धी खात्यात धडक देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिव्या कुमार यांनी दिला.
सरकारी खात्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना योग्य महत्त्व देणे गरजेचे आहे. शेवटी, सर्व 40 आमदार जनतेने निवडले आहेत. माहिती व प्रसिद्धी खात्याला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भेदभाव करण्याचा अधिकार नाही, असे दिव्या कुमार म्हटले आहे.