गोवा खबर:ऊर्जा ट्रेनिंग अँड रिसर्च ॲकॅडमीच्या बाल विकास केंद्र- कला आणि कौशल्य केंद्राचे उद्धाटन नुकतेच करण्यात आले. श्री सिद्धिविनायक सार्वजनिक विश्वस्त समितीच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.
बाल विकास केंद्र आता श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात, घोगळ हाऊसिंग बोर्ड कुडतरी येथे 9 जून 2024 पासून कार्यान्वित झाले आहे. या केंद्राचे उद्घाटन श्री शशिकांत पुनाजी, सदस्य सचिव- बाल भवन, गोवा सरकार यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ.स्नेहा भागवत यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा प्रशिक्षण आणि संशोधन अकादमीला कौशल्य विकास संबंधित अभ्यासक्रम, महिला आणि बाल उत्थान, शैक्षणिक, संशोधन आणि इतर विविध कार्यशाळा आणि सेमिनार प्रदान करण्याचा दीर्घ अनुभव आहे.
आपल्या भाषणात डॉ. स्नेहा भागवत यांनी मुलांना अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याची नितांत गरज असल्याचे सांगितले. लहान वयातच कोणत्याही प्रकारची कला अंगी बाणवण्याचे महत्त्व डॉ.भागवत यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शशिकांत पुनाजी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे ठळक मुद्दे आणि ते मुख्यतः अतिरिक्त क्रियाकलापांवर कसे भर देते हे सांगितले. बालभवन या कलेचे प्रमुख प्रवर्तक म्हणून काम करते आणि म्हणूनच बाल विकास केंद्राच्या रूपाने विविध छोट्या टप्प्यात केंद्रे उघडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमासाठी विशेष अतिथी, श्री. आदेश कारवारकर, उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल ऊर्जा प्रशिक्षण आणि संशोधन अकादमीचे कौतुक केले आणि संपूर्ण सहकार्य केले. श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष श्री रमेश देसाई यांनी स्वागतपर भाषण केले आणि प्रलंबित असलेले हे केंद्र सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे सचिव अभिजित सावंत यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. जे वर्ग सुरू केले जाणार आहेत ते 8 ते 16 वयोगटा मधील मुलांसाठी असून त्यांना तबला, फ्री स्टाईल नृत्य आणि चित्रकला यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे..