गोवा खबर

गोव्याच्या विकासासाठी काहीच कमी पडू देणार नाही ही मोदींची गॅरंटी:मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Published

on

Spread the love
गोवा खबर: गोव्याच्या विकासासाठी काहीच कमी पडू देणार नाही ही मोदींची गॅरंटी. गावडा, कुणबी, वेळीप यांना एसटीचा दर्जा भाजपाने दिला. 2027 मध्ये एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे आणि ती पूर्ण होणार असा विश्वास मुख्यमंत्री ड़ॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. भाजपाच्या दक्षिण गोवा उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांच्या प्रचारासाठी फोंडा येथे आयोजित एनडीएच्या जाहीर सभेत ते बोलत होते. 
यावेळी व्यासपीठावर भाजपाच्या दक्षिण गोवा उमेदवार सौ. पल्लवी धेंपो, भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री. सदानंद शेट तानावडे, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रभारी श्री. आशिश सूद, कृषीमंत्री श्री. रवी नाईक, वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर, कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, जलस्त्रोतमंत्री श्री. सुभाष शिरोडकर, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस श्री. नरेंद्र सावईकर, माजी खासदार श्री. विनय तेंडुलकर, मगोचे नेते श्री. केतन भाटीकर, मगोचे प्रदेशाध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर, फोंडाचे भाजप प्रभारी श्री. प्रशांत देसाई, फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. रितेश नाईक तसेच नगरसेवक, मगोचे कार्यकर्ते तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
2004 ते 2014 पर्यंत देशात आणि राज्यात काँग्रेसचे डबल इंजिन सरकार होते. पण त्यांचे एकही इंजिन सुरू नव्हते. त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला. मात्र 2014 नंतर देशात विकासाचे वारे वाहू लागले. तसेच गोव्यातील एसटी समुदायाला न्याय मिळवून दिला. आता 2027 पर्यंत देशात ‘वन नेशन वन इलेक्शन’ करणे, समान नागरी कायदा, सिटीझन अमेंडमेंट ऍक्ट देशात लागू करणे ही मोदींची गॅरंटी आहे, जी 100 टक्के पूर्ण होणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
‘अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार’ अशी घोषणा देत मुख्यमंत्री डॉ. सावंतांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. मोदीजींनी सुरू केलेल्या विविध योजना अंत्योदय तत्वावर काम करतात. काँग्रेसच्या काळात विविध योजनांचे पैसे लोकांपर्यंत पोहोचत नव्हते. भाजपा धर्मनिरपेक्ष आहे. धर्म-जात भेदभाव न करता समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यावर भाजपाचा विश्वास आहे. तुमचे मत सौ. धेंपो यांना नाही, तर माननीय मोदींसाठी आहे. देशातील नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण यांचा विकास करणे हे भाजपाचे लक्ष्य आहे. स्त्री रक्षणार्थ भाजपाने आज कायदे आणून महिलांचा सन्मान केला. युवा शक्ती ही देशाची ताकद असल्याने त्यांच्या विकासाठी स्कील डेव्हलपमेंट, न्यू एज्युकेशन पॉलिसी, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मुद्रा लोन यासारख्या योजना आणून त्यांना प्रोत्साहन दिले. 2014 अगोदर हजारो शेतकरी आत्महत्या करायचे. मात्र मोदी सरकारने दिलेल्या किसान क्रेडिट कार्ड, सॉईल कार्डमुळे या वर्गाची परिस्थिती बदलली. देशात कुणीच उपाशी पोटी झोपू नये म्हणून गरीब कल्याणासाठी ‘वन नेशन वन रेशन’ योजना सुरू केली. ही विकासाठी ट्रेन अशीच सुरू ठेवायची असेल तर येत्या 7 मे रोजी मोदीजींना मतदान करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
2014 पासून आतापर्यंत मोदी सरकारने देशाचे परीवर्तन केले आहे. युपीए सरकारात प्रत्येक वेळी नवनवीन घोटाळे समोर येत होते. लोक घाबरायचे देशात यायला. मोदी सरकारने महिला भगिनी, युवक, शेतकरी, गरीबांना वर काढण्यासाठी विविध योजना दिल्या. आज देशाची अर्थव्यवस्था 5 व्या क्रमांकावर आहे. म्हणूनच आज आम्ही विकसीत भारताचे स्वप्न पाहतोय. त्यामुळे आमची जबाबदारी आहे तिसऱ्या वेळी देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदींना निवडून द्यायची, असे भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री. सदानंद शेट तानावडे म्हणाले.
तुमचे प्रोत्साहन, आशिर्वाद, पाठिंबा मी कधीच विसरू शकत नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली गोव्यात साधन सुविधा आल्यात. रस्ते, पूल, इन्स्टिट्यूट्स, रेल्वे यांना राज्यात मार्ग मोकळा झाला. माननीय मोदीं म्हणजे आमचा विश्वास, विकास आणि आमचा आधार. भाजपा नेहमीच तुम्हाला आधार देत आले आहे. आज तुमचा आधार आम्हाला महत्त्वाचा आहे. मी खासदार म्हणून निवडून आल्यास दक्षिण गोव्यातील जनता माझे पहिले प्राधान्य असेल, असे आश्वासन भाजपाच्या दक्षिण गोवा उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांनी दिले.
देशात सुशासन येण्यासाठी, युवकांना संधी देण्यासाठी मोदी सरकार हवे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी भाजपाच्या संकल्प पत्रात तुमच्या मुलांच्या सुखमय भविष्याचा रस्ता खुला केला आहे. त्यामुळे येत्या 7 मे रोजी कमळाचे बटण दाबून भाजपाला निवडून द्या, असे आवाहन भाजपचे लोकसभा निवडणूक प्रभारी श्री. आशिश सूद यांनी केले.
भाजपा जाती-धर्माचा खेळ करत नाही. भाजपा फक्त दोनच जाती मानते, स्त्री आणि पुरुष. इतर पक्ष जाती-धर्माचे राजकारण करतात. त्याला तुम्ही सुजाण मतदार बळी पडू नका. धेंपो घराण्याचे ऋण फेडण्याची आम्हा गोंयकारांना ही चांगली संधी आहे. धेंपो यांनी सुरू केलेल्या खाणींमुळे अनेक गोंयकारांना रोजगार मिळाला. त्यामुळे ‘अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार’ म्हणत भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देऊयात. आज देशाला मोदींची गरज आहे. त्यासाठी मोदींना बळकट करूया, अशी हाक मंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी उपस्थितांना मारली.
आतापर्यंत कितीतरी पंतप्रधान होऊन गेले, पण जबाबदारी घेऊन काम करणारे मोदी पहिलेच. सर्व त्याग करून माननीय नरेंद्र मोदी देशाच्या जनतेसाठी समर्पित आहेत. बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी भाजपा सरकारने नेहमीच महत्व दिले आहे. त्यामुळे या भाजपा सरकारला निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे, असे मंत्री तथा शिरोड्याचे आमदार श्री. सुभाष शिरोडकर म्हणाले.
काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे विधानसभेतील कट मोशन आहे. त्यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व गोष्टी भाजपा सरकार करते आहे. काँग्रेस गोव्यात आल्यानंतर ड्रग्स गोव्यात आले. कोळसा गोव्यात कुणी सुरू केला हे जाहीर आहे. लोकांची दिशाभूल करणारा काँग्रेसचा जाहीरनामा आहे. संविधानामुळे सामान्य माणसाला मान सन्मान मिळाला आहे, पण काँग्रेसचे केंद्रिय नेते हेच संविधान बदलणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू नका, असे आवाहन आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

Trending

Exit mobile version