गोवा खबर;प्रत्येक गोमंतकीयाचे आरोग्य सुनिश्चित करताना मोफत आधुनिक वैद्यकीय सेवा देण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. आता आयुष्मान भारत आणि दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजना एकत्रित करून त्याचा लाभ प्रत्येक गोमंतकीयांना मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भविष्यात राज्यात एम्स इस्पितळ सुरू होण्याची आशा आहे. भाजपाचा प्रत्येक मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ता सामान्यांचे जीवन बदलण्यासाठी काम करतो. पुढील तीन वर्षे राज्यात भाजपाचे सरकार आहे. केंद्रातही भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर गोव्यातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत राहणार आहे. यामुळे कोणासोबत राहिल्यास राज्याला, राज्यातील प्रत्येक नागरिकाला फायदा होणार याचा विचार सूज्ञ मतदारांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री श्री. विश्वजीत राणे यांनी भाजपाच्या पणजी मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा सरचिटणीस श्री. दामू नाईक व आमदार श्री. केदार नाईक उपस्थित होते.
आरोग्य क्षेत्रातील सुविधांविषयी बोलताना आरोग्य मंत्री श्री. विश्वजीत राणे म्हणाले, केंद्राच्या साह्याने साकारलेल्या सुपर स्पेशॅलिटी इस्पितळाचा लाभ अनेकांना होत आहे. कॅन्सर रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्यात 350 कोटींचे कॅन्सर इस्पितळ उभे राहत आहे. टाटा मेमोरियल इस्पितळात गोव्यातील 50 परिचारिका प्रशिक्षण घेत आहेत. इस्पितळ सुरू झाल्यानंतर या परिचारिका सेवा देण्यासाठी सज्ज असतील. सरकारकडून सध्या 4.5 लाखांचे कॅन्सरवरील इंजेक्शन तसेच केमोथेरपी सुविधा मोफत दिली जात आहे. 108 रुग्णवाहिका, कार्डियाक एम्ब्युलन्स सारख्या सुविधा गोव्यात उपलब्ध आहेत. रोबोटिक सर्जरी, आयव्हीएफ सुविधा मोफत देणारे गोवा पहिले राज्य आहे. महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकीन, स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जेनरिक औषधालये केली गेली आहेत, असे त्यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यातील लोकांना आधुनिक आणि तत्पर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयात गोमंतकीय विद्यार्थ्यांना अतिरिक्त जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. या इस्पितळात तज्ज्ञ डॉक्टरांसह अतिदक्षता विभाग, कॅथ लॅबसारख्या सेवा मिळणार आहेत, असे आरोग्यमंत्री श्री. विश्वजीत राणे यांनी सांगितले.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जागतिक नेते असल्याने त्यांच्या कृतीवर लोकांचा विश्वास आहे. श्री. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे ही लोकांची इच्छा आहे कारण लोकांच्या भावना त्यांच्याशी जोडल्या आहेत. मला गर्व आहे की श्री. नरेंद्र मोदी यांचा मी कार्यकर्ता आहे, असे आरोग्यमंत्री श्री. विश्वजीत राणे म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मंत्री, आमदार, कार्यकर्ता मन लावून लोकांची कामे करत आहे. उत्तर व दक्षिण गोव्यातील जनता जागरूक आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत श्री श्रीपाद नाईक ऐतिहासिक मताधिक्क्याने विजयी होणार आहते. सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो यांना सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे. भाषण करण्याच्या बाबतीत त्या नवख्या असल्या तरी लोकांना न्याय देण्याची, लोकांसाठी काम करण्याची तळमळ त्यांच्यात आहे. लोकसभेवर निवडून आल्यानंतर सौ. पल्लवी धेंपो जनतेच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरतील, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री. विश्वजीत राणे यांनी व्यक्त केला.
केंद्र तसेच राज्य पातळीवर काँग्रेसचे नेते पक्षातून बाहेर का पडत आहेत, याचे कारण काँग्रेसने शोधले पाहिजे, असा सल्ला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी यावेळी दिला.