मनोज परब यांचे गाव, पर्यावरण आणि जमिनी वाचाविण्यासंदर्भातील निवेदन मांद्रे पंचायतीला सुपूर्द
गोवा खबर:काही दिवसांपूर्वीच मांद्रे ग्रामपंचायतीतर्फे आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांकडे मांद्रेतील जमिनी आणि गाव वाचविण्यासंदर्भात लेखी स्वरूपात उघड पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने काल गुरुवारी रेव्होलुशनरी गोवन्सतर्फे उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार मनोज परब यांनी मांद्रे पंचायतीच्या ह्या आवाहनाचे गांभीर्य लक्षात घेवून, मांद्रेतील जनतेचे त्याचबरोबर गावातील जमिनींचे संरक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे लेखी स्वरुपात पत्र मांद्रे पंचायतीला सुपूर्द करण्यात आले.
हल्ली पेडणे तालुक्यात बेसुमार मोठमोठे प्रकल्प उभारले आले आहे. मात्र सामान्य गोवेकरांना कोणताच फायदा झालेला नाही. मोपा विमानतळ, आयुष हॉस्पिटल ह्या सारखे मेगा प्रकल्प उभारले गेले. ह्या प्रकल्पासाठी सर्रासपणे सामान्य आणि गरीब लोकांच्या जमिनी अक्षरशः हडपण्यात आल्या. त्यांना मोबदला सुद्धा देण्यात आला नाही. कित्येक जमिनी बिल्डर लॉबीच्या घशात घातल्या. नोकऱ्यांचे आमीष दाखविण्यात आली. राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात पेडणे – मांद्रे वासीयांचि फसवणूक केली गेली. आर.जी.चे उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार मनोज परब यांनी याबद्दल दुःख व्यक्त केले असून लोकांच्या आशीर्वादाने निवडून आल्यास आपण पेडणे वासियांच्या समस्या व पेडणे व मांद्रेतील जमिनींचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे. काल लेखी स्वरुपात मनोज परब यांनी मांद्रे ग्रामपंचायतीला आपण गावाचे अस्तित्व, पर्यावरण, तेथील निसर्ग व जमिनी राखण्यासाठी कटिबध्द असल्याचे जाहीर करत अशाप्रकारचे लेखी निवेदन पंचायतीला सुपूर्द केले . यावेळी मनोज परब त्याचबरोबर मांद्रेवासिय व पंचसदस्य हजर होते.