गोवा खबर:एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी जनतेच्या मनात भीती पसरवत आहे की, घटनेत बदल करण्यासाठी भाजपाला 400 पार जागा हव्या आहेत. तर दुसरीकडे त्यांचेच नेते गोव्याला विशेष दर्जा देण्यासाठी राहुल गांधी यांच्या परवानगीने घटनेत बदल करणार असल्याचे सांगत आहेत. एकीकडे कुटुंब प्रमुखाच्या निधानानंतर त्याच्या संपत्तीचा मोठा वाटा शासनाकडे जमा करण्यासाठी काँग्रेस इनहेरीटन्स टॅक्स म्हणजे वारसा कर लागू करण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे मोदी सरकार ठोस योजना राबवून त्याची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात वळवत आहे. अद्याप नेता न ठरलेल्या नेतृत्वहीन अशा इंडी आघाडीकडे आपल्याला देशाची सत्ता सोपवायची आहे की भक्कम, सशक्त, विकसित भारतचे स्वप्न पाहणाऱ्या कणखर नेत्याला परत एकदा पंतप्रधान बनवायचे आहे, याचा निर्णय जनतेने घेतला पाहिजे, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर व प्रवक्ते श्री. गिरिराज पै वेर्णेकर उपस्थित होते.
राष्ट्रीय सरचिटणीस श्री. तावडे म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळी भंडारा मतदारसंघातून अधिकृत तिकिट देऊन पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले. तर भाजपाने 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती दिनी संविधानाची प्रत समोर ठेऊन आपला जाहीरनामा – संकल्प पत्र प्रसिद्ध केले. काँग्रेसचा डोळा आमच्या-तुमच्या वाडवडिलांच्या संपत्तीवर, पैशांवर असल्यानेच वारसा कर लादण्याचा विचार केला जात आहे. हे पैसे कोणाला मिळणार याचे संकेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी दिलेले आहे. यातून काँग्रेस काय करू शकते यांचा अंदाज येऊ शकते. या उलट भाजपा सरकारने आय़ुष्मान कार्डाच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा, जलजीवन मिशनतर्फे 100 टक्के घरांना पाणी, स्टार्ट अप, पीएम उज्ज्वला योजनेद्वारे 10 लाख एलईडी बल्ब, मातृवंदना, स्वच्छ भारत, किसान सम्मान योजनेखाली 6 हजार रुपये अशा अनेक माध्यमांतून जनेतला आर्थिक साह्य केलेले आहे, असे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. तावडे यांनी सांगितले.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुद्दे नसल्याने विरोधक फसतात. संविधानाविषयी गोव्यातील उमेदवाराने केलेल्या वक्तव्यावर श्री. राहुल गांधी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत कारण ती काँग्रेसची नीती आहे, असे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. तावडे म्हणाले. सध्या दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळमध्ये भाजपा उल्लेखनीय जागा जिंकणार असे वातावरण आहे. गोव्यातील दोन्ही जागा जिंकल्यास त्याचे श्रेय राष्ट्रीय आणि स्थानिक नेतृत्वच नव्हे तर श्री. मोदी म्हणतात त्याप्रमाणे बुथवरील प्रत्येक कार्यकर्त्याचे असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.