गोवा खबर

मोदी सरकारच्या काळात महिलांचा विकास:दामू नाईक

Published

on

Spread the love
गोवा खबर: देशाला स्वतंत्र होऊन साठ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. पण स्त्रियांचा विकास मात्र झाला नाही. देश स्वतंत्र होऊनही बाई मात्र रांधा वाढा उष्टी काढा यातच गुरफटलेली. मात्र  पंतप्रधान  नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर महिलांचा खऱ्या अर्थाने विकास होताना दिसतो आहे. चित्र बदलते आहे. मोदी सरकारने महिलांसाठी विशेष कायदे आणलेत. आता नारी शक्तीसाठी मोदी सरकारने विशेष विधेयक मंजूर केले. महिलांना आरक्षण दिले. आता ते महिलांना नेतृत्व करण्याची संधी देत आहेत. आमच्या राज्यात दक्षिण गोव्याला पहिल्यांदाच महिला उमेदवार देऊन महिलांच्या विकासासाठी, महिलांचे प्रश्न हाताळण्यासाठी मोदी सरकार सक्षम असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी दिला आहे. पल्लवी  धेंपो यांच्या रुपात आम्हाला सुशिक्षित आणि महिलांचे प्रश्न समोर आणून त्यांना वाचा फोडण्यासाठी एक कणखर असा उमेदवार मोदी सरकारने दिला आहे. त्यामुळे फातोर्डावासीयांना मी आवाहन करतो, की एकमताने आम्ही पुढे येऊन नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत साकारूया, असे आवाहन फातोर्डाचे माजी आमदार तथा भाजपा सरचिटणीस  दामू नाईक यांनी केले.
भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांनी मंगळवारी सकाळी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर दुपारी ४ वाजल्यापासून फातोर्डा मतदारसंघात प्रचार दौरा केला. यावेळी गाविळवाडा फातोर्डा येथे आयोजित कोपरा बैठकीला संबोधताना ते बोलत होते. या प्रचार दौऱ्यावेळी सौ. धेंपो यांच्यासोबत फातोर्डाचे माजी आमदार तथा भाजपा सरचिटणीस  दामू नाईक, मडगाव आमदार दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री तथा पेडणेचे माजी आमदार  मनोहर (बाबू) आजगावकर तसेच इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
आजवर मोदी सरकारने महिलांसाठी जेवढ्या योजना राबवल्या आहेत, त्या अजून कुठल्याच सरकारने दिलेल्या नाहीत. २०१४ ते २०२४ हा नरेंद्र मोदींचा कार्यकाळ पाहायचा झाला तर केवळ विकासच दिसतो.  ग्रामीण भागात शौचालय नसल्यामुळे महिलांना उघड्यावर शौचास बसावे लागे. यात महिलांची विशेषत होणारी कुचंबणा लक्षात घेऊन मोदी सरकारने घरोघरी शौचालये उभारली. पाण्यासाठी महिलांची मैलोन मैल पायपीट होऊ नये म्हणून त्यांनी ‘हर घर नल, हर घर जल’ आणले. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या असंख्य महिलांना घरघुती एलपीजी गॅस जोडण्या दिल्या. त्याप्रमाणे मुलींचे संरक्षण आणि शिक्षणासाठी ‘बेटी बचाव बेटी पढाव’, अंधार असलेल्या घरांना उज्ज्वल करण्यासाठी ‘उज्ज्वला योजना’ अशा सगळ्या योजना महिलांना केंद्रस्थानी ठेवून दिल्या आहेत. या महिलांचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी मोदी सरकार आता महिलांना उमेदवारी देऊन पुढे आणत आहे. पंतप्रधानांच्या या प्रयत्नाला बळ देत दक्षिण गोव्यात त्यांनी दिलेल्या महिला उमेदवार सौ. धेंपो यांना आम्ही बहुमताने निवडून देत लोकसभेवर पाठवुया, अशी हाक श्री. नाईक यांनी उपस्थितांना मारली.
यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी उपस्थितांना रामनवमीच्या शुभेच्या दिल्या. तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी पुढे येण्याकरता उपस्थितांना आवाहन केले. श्री. कामत म्हणाले, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक देशाची आहे. कुठल्या दिशेने देश जाणार, देशाचा पुढे संकल्प काय असणार आणि तो संकल्प करण्याची ताकद कुणाकडे आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. गेल्या १० वर्षातील नरेंद्र मोदींची कारकीर्द पाहिल्यास पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आणणे ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची हॅट्ट्रिक करणे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी दक्षिण गोव्यातून सौ. धेंपो यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देत लोकसभेवर पाठवणे गरजेचे आहे. कारण यातून इतिहास घडणार. पुढे जेव्हा गोव्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा भारतीय जनता पार्टीने दक्षिण गोव्यातून लोकसभेवर पाठवलेल्या पहिल्या महिला खासदार म्हणून सौ. धेंपो यांचा उल्लेख असेल. आणि याचे श्रेय दक्षिण गोव्यातील तुम्हा मतदारांना जाईल. भारत हा सोन्याचा देश असल्याचे इतिहासात म्हटले आहे. तशाच भारताची पुनर्निर्मिती करणे मोदींचे स्वप्न आहे. भारताला जगात महाशक्ती करण्याचे मोदींचे लक्ष्य आहे. आज मोदींनी देशाला जगात आदर मिळवून दिला आहे. त्यासाठी मोदींचे हात बळकट करूया, असे कामत म्हणाले.
२६ वर्ष मी सामाजिक, शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहे. आम्ही गरजवंत मुलांना स्कॉलरशिप देतो. आम्ही कधीच धर्म, जातीच्या आधारावर भेदभाव करत नाही. २०१६ पासून ८ सरकारी शाळा आम्ही दत्तक घेतल्या आहेत. तिथे आम्ही साधन-सुविधा दिल्या आहेत. मोदींनी महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी असंख्य योजना, संधी दिल्या आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात मन लावून काम करतात. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळणार याचा मला विश्वास आहे, असे सौ. धेंपो म्हणाल्या.
या प्रचार दौऱ्याच्या वेळी सौ. धेंपो यांनी बोर्डा येथील सेंट ज्योकिम  चॅपेल जवळील कॅलाझार सिया हॉल येथे त्यांनी स्थानिकांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर विद्यानगर येथील संचायनी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, आगाळी इस्टेट हाउसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी फातोर्डा आणि पाजीफोंड येथील जुंता कॉर्टर्स येथे कोपरा बैठकीत भाग घेतला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सौ. धेंपो यांना लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला.

Trending

Exit mobile version